स्मार्ट मीटर रोखणार वीजचोरी, वीजचोरांना महावितरणचा झटका

स्मार्ट मीटर रोखणार वीजचोरी, वीजचोरांना महावितरणचा झटका

मनमाड : वीज चोरीला कायमचा आळा बसविण्यासाठी वीज महावितरण कंपनीने नवीन शक्कल लढवली असून आता रिचार्ज स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे. मोबाईल, डिश टीवी, केबल प्रमाणे हे मीटर असणार आहे. जसे रिचार्ज संपताच मोबाईलची सेवा बंद होते किंवा केबल टीव्ही सेवा खंडीत होते, त्याचप्रमाणे रिचार्ज संपताच लाईट वीजपुरवठा बंद होईल.

केंद्र शासनातर्फे स्मार्ट मीटर बसविण्याबाबत राज्य सरकारकडून माहिती मागविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुरुवातीला मोठ्या शहरात ही मोहीम राबविण्यात येणार असून त्यानंतर टप्प्याटप्याने छोटे शहर आणि त्यानंतर ग्रामीण भागात स्मार्ट मीटर अर्थात प्रिपेड मीटर बसविण्यात येणार आहे. ही योजना सुरु झाल्यानंतर मीटर रिडींग आणि वीज बिलाबाबत होत असलेल्या तक्रारींपासून सुटका होऊन बिल भरण्यासाठी होणारी धावपळ देखील संपेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित किंवा महावितरण ही महाराष्ट्र शासनाची विद्युत वितरण करणारी कंपनी आहे. विद्युत कायदा २००३ अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन ६ जून २००५ रोजी महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या. मुंबई शहर वगळता संपूर्ण राज्यात वीज वितरण करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे.

सध्या महावितरणचे सुमारे २ कोटी ८७ लाख ग्राहक असून, त्यात सुमारे १ कोटी ३१ लाख घरगुती, ३० लाख कृषी,१३ लाख ४६ हजार वाणिज्यिक २ लाख ५० हजार औद्योगिक ग्राहकांचा समावेश असून कर्मचार्‍यांची संख्या ७६ हजार पेक्षा जास्त आहे. महावितरणला वर्षाला सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्यामुळे महावितरण तोट्यात आले आहे. त्यामुळे वीज चोरीला आळा घालण्यासाठी प्रिपेड स्मार्ट मीटर योजना राबविण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून हे मीटर रिचार्ज करणारे असणार आहे. रिचार्ज केले कि लाईट सुरु.. रिचार्ज संपले कि लाईट बंद होईल.

ही योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाने राज्य सरकारकडून माहिती आणि अहवाल मागविला आहे. लवकरच ही योजना सुरु होईल. सुरुवातील मोठे शहर त्यानंतर छोटे शहर आणि ग्रामीण भागात ही मोहीम टप्प्या टप्प्याने राबवली जाणार आहे.या योजनेमुळे वीज चोरी होणार नाही असा दावा केला जात आहे.

First Published on: November 29, 2021 1:00 PM
Exit mobile version