आता PUC चाचणीसाठी मोजा जास्त पैसे, नवे दर लागू

आता PUC चाचणीसाठी मोजा जास्त पैसे, नवे दर लागू

आपल्या कारची किंवा टू व्हीलरची (pollution under control) PUC चाचणी करायला पीयूसी केंद्रावर जात असाल तर वाढीव दर मोजण्याची वेळ येणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या दरानुसार आता वाहनाच्या पीयूसी चाचणीला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. सोमवारपासूनच नव्या दरांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याबाबतचे दर हे सर्व प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक कार्यालयाला कळविण्यात आले आहेत. याआधीच राज्य शासनाने पीयूसी चाचणीच्या दराला वाढीव पैसे आकारण्यासाठीची मंजुरी देण्यात आली होती.

महाराष्ट्रात वाहनांची वायुप्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र जारी करण्यासाठीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनानुसार या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने याबाबतचे नवीन परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे २५ एप्रिलपासून नवीन दर पीयूसी चाचणीसाठी आकारण्यात येणार आहेत. दुचाकी वाहने, पेट्रोलवरील तीन चाकी वाहने, पेट्रोल सीएनजी, एलपीजीवर चालणारी चार चाकी वाहने तसेच डिझेलवर चालणारी वाहने याबाबतचे नवे दर अंमलात आले आहेत.

कसे आहेत नवे दर

वाहन                                 जुना दर               नवा दर

१ दुचाकी वाहन                                                  ३५                         ५०
२ पेट्रोल ३ चाकी वाहन                                          ७०                         १००
३ पेट्रोल,CNG,LPG ४ चाकी                                   ९०                         १२५
४ डिझेलवर चालणारे वाहन                                     ११०                         १५०

पीयूसी चाचणीसाठी सर्वाधिक पैसे हे डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी मोजावे लागणार आहेत. एका चाचणीसाठी डिझेल वाहनासाठी याआधी १०० रूपये मोजावे लागत होते, आता १५० रूपये मोजावे लागतील. दुचाकी वाहनासाठी याआधी ३५ रूपये चाचणीसाठी मोजावे लागत होते. आता ५० रूपये मोजावे लागणार आहेत. पेट्रोलवरील तीनचाकी वाहनासाठी याआधी ७० रूपये मोजावे लागत होते, आता १०० रूपये मोजावे लागणार आहेत. चार चाकी पेट्रोल, सीएनजी, एलपीजी चारचाकी वाहनासाठी ९० रूपये मोजावे लागत होते, आता १२५ रूपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनासाठी याआधी ११० रूपये मोजावे लागत होते, आता १५० रूपये मोजावे लागणार आहेत.


 

First Published on: April 27, 2022 9:54 PM
Exit mobile version