ओबीसी, सर्वसाधारण महिलांसाठी मुंबईत नवी प्रभाग आरक्षण सोडत आता २९ जुलैला

ओबीसी, सर्वसाधारण महिलांसाठी मुंबईत नवी प्रभाग आरक्षण सोडत आता २९ जुलैला

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता आगामी निवडणुकांत ‘ओबीसीं’साठी राजकीय आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वसाधारण प्रभाग, सर्वसाधारण महिला प्रभागासाठीचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यासाठी आता नव्याने सोडत काढण्यात येणार असल्याने मागील आरक्षण सोडतीत ज्यांना लॉटरी लागली त्यांची चिंता वाढली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ३१ मे रोजी काढलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमधील फक्त अनुसुचित जाती – १५ प्रभाग (त्यापैकी ८ प्रभाग महिला), अनुसूचित जमाती – २ प्रभाग (त्यापैकी १ महिला) हे आरक्षण कायम ठेवत उर्वरित सर्वसाधारण प्रभाग आणि सर्वसाधारण महिला प्रभाग असे एकूण २१९ प्रभागांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. आता २९ जुलै रोजी वांद्रे येथील रंगशारदामध्ये पुन्हा नव्याने सर्वसाधारण प्रभाग, सर्वसाधारण महिला प्रभागसाठीचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे मागील आरक्षण सोडतीत ज्यांना लॉटरी लागली त्यांची चिंता वाढली आहे. त्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ‘ओबीसी’साठी ६३ प्रभाग व त्यामधून महिलांसाठी ५० टक्के म्हणजे ३२ प्रभाग आरक्षित करण्यासाठीही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आधी दिलेल्या आदेशानुसार ‘ओबीसी’आरक्षण वगळून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गेल्या ३१ मे रोजी सर्वसाधारण महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ‘ओबीसी’ आरक्षण लागू करण्याबाबत हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या एकूण २३६ प्रभागात निवडणूक घेताना ‘ओबीसी’साठी २७ टक्के म्हणजे ६३ प्रभाग (यामध्ये ५० टक्के महिला म्हणजे ३२ प्रभाग) आरक्षित करणे बंधनकारक झाले आहे.

यापूर्वी म्हणजे २०१७ च्या निवडणुकीत २२७ प्रभागांतून ओबीसीसाठी २७ टक्के आरक्षण होते. म्हणजेच २२७ पैकी ६१ प्रभाग आरक्षित होते. मात्र आता शासन निर्णयानुसार २२७ ऐवजी २३६ प्रभाग झाले आहेत. त्यामुळे ओबीसीसाठी २७ टक्के प्रमाणे ६३ प्रभाग आरक्षित होणार असून त्यामधूनच महिलांसाठी ५० टक्के म्हणजे ३२ प्रभाग आरक्षित केले जाणार आहेत.

असा आहे आरक्षण सोडत कार्यक्रम

First Published on: July 22, 2022 9:34 PM
Exit mobile version