दाऊदच्या हस्तकांवर एनआयएची कारवाई, मुंबई परिसरातील २४ ठिकाणी छापेमारी

दाऊदच्या हस्तकांवर एनआयएची कारवाई, मुंबई परिसरातील २४ ठिकाणी छापेमारी

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक आणि निकटवर्तीयांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी धडक कारवाई केली आहे. एनआयएकडून सोमवारी पहाटेपासून मुंबईतील २४ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. यापैकी काही छापे माहीम परिसरात टाकण्यात आले. माहीम दर्ग्याचे ट्रस्टी सुहेल खंडवानी यांच्या घराचाही यात समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावरील कारवाईनंतरच सुहेल खंडवानी यांचे नाव सातत्याने पुढे येत होते. दुसरीकडे छोटा शकिलचा साडू सलीम फ्रूटला ग्रँट रोड इथून एनआयएने ताब्यात घेतले. तर माहिममधून छोटा शकिलशी संबंधित मोबिडा भिवंडीवाला या महिलेला एनआयएने ताब्यात घेतले आहे. तसेच पायधुनी भागातील एका ७१ वर्षीय व्यक्तीच्या घरीही एनआयएने छापेमारी केली आहे.

एनआयएने सोमवारी पहाटेपासूनच या कारवाईला सुरुवात केली. भेंडीबाजार, नागपाडा, बोरिवली, गोरेगाव, मुंब्रा, मीरा- भाईंदर, भिवंडी, सांताक्रूझ, परळ येथील एकूण २४ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याचे वृत्त आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शूटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार डी कंपनी आणि दाऊद इब्राहिम टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्ज स्मगलिंग आणि फेक करन्सी (एफआयसीएन)मध्ये व्यापार करून भारतात दहशत पसरवण्याचे काम करीत आहे.

एवढेच नाही तर दाऊद इब्राहिम आणि त्याची डी कंपनी लष्कर-ए-तोयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम) आणि अल-कायदाच्या माध्यमातून भारतात दहशतवादी कारवाया करीत आहेत. या यादीत छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेमन यांचाही समावेश आहे. या कारवाईत दाऊदच्या संशयित साथीदारांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची कागदपत्रे, रोख रक्कम आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएने दिली आहे.

एनआयए केवळ दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीच्या दहशतवादी कारवायांचाच तपास करीत नसून अंडरवर्ल्ड डॉनचे गुंड छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेमन, इक्बाल मिर्ची (मृत), दाऊदची बहीण हसिना पारकर (मृत) यांच्याशी संबंधित दहशतवादी कारवायांचाही तपास करीत आहे. या कारवाईतून आता एनआयएच्या हाती काय लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

First Published on: May 10, 2022 5:00 AM
Exit mobile version