Nitesh Rane : नितेश राणेंना अटकेपासून दिलासा, 7 जानेवारीला अटकपूर्व जामीन अर्जावर होणार सुनावणी

Nitesh Rane : नितेश राणेंना अटकेपासून दिलासा, 7 जानेवारीला अटकपूर्व जामीन अर्जावर होणार सुनावणी

Nitesh Rane : नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल, रुग्णालयातून डिस्चार्ज

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर आज पुन्हा हायकोर्टात सुनावणी होणार होती. मात्र राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी कोर्टाकडे दोन दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे नितेश राणे यांची अटक तूर्तास तरी टळली आहे. प्रतिज्ञापत्र सादर होत नाही तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नाही अशी तोंडी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे.

त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी आता पुन्हा शुक्रवारी अर्थात 7 जानेवारीला दुपारी 2:30 वाजता होणार आहे. या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूचे वकील काय युक्तिवाद करणार आणि नितेश राणेंना अटक होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. हा हल्ला भाजप आमदार नितेश राणे यांनी घडवून आणला असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. या प्रकरणाची सिंधुदुर्ग पोलीस चौकशी करत आहेत. मात्र चौकशीदरम्यान आमदार नितेश राणे यांचेही नाव आल्याने त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अटक टाळण्यासाठी नितेश राणेंचे वकील अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी सिंधुदुर्ग सेशन कोर्टात अर्ज केला होता. सुमारे तीन दिवस चाललेल्या दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर सिंधुदुर्ग सेशन कोर्टाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

त्यानंतर नितेश राणेंच्या वकिलांनी सोमवारी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून सिंधुदुर्ग सेशन कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. मात्र राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितल्याने आता नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.


 

First Published on: January 4, 2022 12:10 PM
Exit mobile version