डबलडेकर एसी इलेक्ट्रिक बस ही मुंबईसह देशाची गरज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

डबलडेकर एसी इलेक्ट्रिक बस ही मुंबईसह देशाची गरज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

मुंबई : डबलडेकर एसी इलेक्ट्रिक बस ही मुंबईसह देशाची गरज आहे. आज डबलडेकर एसी इलेक्ट्रिक बस मुंबईत दाखल झाली आहे. लंडनच्या धर्तीवर मुंबईसह देशाला डबलडेकर एसी इलेक्ट्रिक बसगाड्यांची आवश्यकता आहे हे मी तीन-चार वर्षांपूर्वी लंडनला गेलो असताना माझ्या लक्षात आले. आज प्रत्यक्षात लंडनच्या धर्तीवर मुंबईत डबलडेकर एसी इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे, याचा आनंद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

बेस्टच्या पहिल्या एसी डबल डेकर बसचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यशवंत चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आज इलेक्ट्रिक डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात येत असल्याने मी आनंदित आहे. प्रदूषणमुक्त देशासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. एकूण प्रदूषणापैकी 35 टक्के प्रदूषण हे पेट्रोल आणि डिझेलमुळे होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषणात घट होईल, असा दावा नितीन गडकरी यांनी यावेळी केला.

इलेक्ट्रिक एसी दुमजली बस ही मुंबईसाठी एक वेगळी व चांगली संकल्पना आहे. भविष्यात पेट्रोल व डिझेल यांचा वापर बंद होईल आणि वाहनांसाठी हायड्रोजन, इथेनॉल आदी पर्यायी इंधनाची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे प्रदूषण कमी होईल, असे ते म्हणाले. यावेळी हिंदुजा ग्रुप ऑफ कंपनीजचे अशोक हिंदुजा, अशोक लेलँडचे शोम हिंदुजा, स्विच मोबिलिटीचे सीईओ महेश बाबू आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई ते दिल्ली नवीन महामार्ग सुरू करण्यात येणार आहे. हा महामार्ग नरिमन पॉईंट येथे जोडण्यात येणार आहे. मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचे जवळजवळ 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर इलेक्ट्रिक गाड्यांची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई – दिल्ली प्रवास अवघ्या 12 तासांत शक्य होणार असून प्रवासात 12 तासांचा वेळ वाचणार आहे, असा दावा नितीन गडकरी यांनी केला.

यावेळी, नितीन गडकरी यांनी डबलडेकर एसी इलेक्ट्रिक बसमध्ये बसून एक फेरफटका मारला. डबलडेकर एसी बसमधील गारेगार बस प्रवासाचा आनंद लुटला. पूर्णपणे अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली आणि प्रदूषण पूर्णपणे कमी करणारी ही बस डिसेंबर ते जानेवारी महिन्यात प्रवाशांच्या सेवेत बेस्टकडून प्रवाशांच्या सेवेत सुरु करण्यात येणार आहे. लवकरच बेस्टच्या ताफ्यात २०० इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहे.

First Published on: August 18, 2022 9:44 PM
Exit mobile version