‘आता दिवा पेटला?’ इटली प्रेमावरून डॉ. नितीन राऊतांचा भाजपला टोला

‘आता दिवा पेटला?’ इटली प्रेमावरून डॉ. नितीन राऊतांचा भाजपला टोला

‘काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या इटलीत झालेल्या जन्मावरून त्यांची हेटाळणी करण्यात भाजपचा जन्म गेला. मोदी आणि त्यांचे असंस्कृत सहकारी, सोनियाजींना, राहुलजींना इटलीवरुन किती अश्लील, अश्लाघ्य बोललेत याची गणतीच करता येणार नाही. पण थाळ्या वाजवा, लाईट विझवा, मेणबत्त्या लावा या कल्पना मात्र त्यांनी थेट कोरोनाग्रस्त इटलीवरुन आयात केल्या आहेत. आपले अपयश झाकायला, लोकांना एक ‘इव्हेंट’ द्यायला यांना सोयीस्कररीत्या ‘इटली’ चालते, तिथे यांचे बेगडी देशप्रेम, हिंदुत्व आडवे येत नाही’, अशी टीका ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भाजप आणि मोदी यांच्यावर केली आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अर्धी चड्डी सुद्धा डॉ. मुंजे यांनी इटलीच्या बेनिटो मुसोलिनीकडूनच आणली होती की! आता दिवा पेटला? तो मालवू नका’, असा टोला डॉ. राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

‘कोणी कधी, किती दिवे लावावे आणि विझवावे, कुठल्या कारणासाठी पेटवावे आणि मालवावे, हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे. मी राज्याचा ऊर्जामंत्री असलो तरी त्यात मी हस्तक्षेप करु शकत नाही. लोकांच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा माझा आणि माझ्या पक्षाचा स्वभाव सुद्धा नाही. कोणी काय खावे, काय प्यावे, काय लावावे हे सुद्धा आजकाल संस्कृती रक्षक ठरवतात. पण आम्ही वेगळे आहोत’, अशी टीका देखील त्यांनी भाजपवर केली आहे.

कोरोनाचा मुकाबला पणत्यांनी कसा होणार?

पंतप्रधानांनी रविवारी विजेचे दिवे रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी बंद करा आणि पणत्या, मेणबत्त्या लावा असे सांगितले. यावर डॉ. राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘मोदींच्या घोषणेनंतर मी लगेच माझ्या सर्व ज्येष्ठ अभियंत्यांसोबत तातडीने चर्चा केली. अचानक दिवे बंद झाले तर विद्युत पुरवठ्यावर किती तांत्रिक अडचणी, भार येईल हे स्पष्ट करणारा एक व्हिडीओ मी कालच प्रसारित केला. कोरोनाचा सामना करण्यासाठी भारत एकजुटीने उभा आहे, हे प्रत्यक्ष दिसताना, कोरोनाचा मुकाबला पणत्या लावून आणि दिवे मालवून कसा होणार?’ असा सवाल देखील डॉ.राऊत यांनी केला आहे.

२’०१४ नंतर भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला जात आहे. विजेचा वापर दिवसेंदिवस कमी होत आहे. तो अर्थव्यवस्थेच्या वाढीचे एक महत्त्वाचे मापक असतो हे सनातन सत्य आहे. तद्वतच, वीज वापर घटली ही टाळ्या पिटण्यासारखी गोष्ट नाही. देशातील बहुतांश औष्णिक ऊर्जा प्रकल्प फक्त ४९ % क्षमतेवर चालू आहेत. अर्थातच सरकारी बँकांच्या कर्ज थकवणाऱ्यांमधे ते आघाडीवर आहेत. आधी नोटबंदी, नंतर जी. एस. टी., अशा तुघलकी निर्णयांमुळे लघु आणि मध्यम उद्योगधंदे गर्तेत गेले. एकेकाळी गजबजलेल्या महाराष्ट्रातील सर्व एमआयडीसीच्या आवारात आज स्मशान शांतता असते. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्किल इंडिया अशा आकर्षक नावे असलेल्या २०६ घोषणा सहा वर्षे ऐकल्या. पण जाहिरातबाजी आणि पंचतारांकित समारंभ, याशिवाय त्यातून काहीएक निर्माण झाले नाही, अशी टीका डॉ. राऊत यांनी केली.

आधीच उपाशी, त्यात सक्तीची एकादशी…

‘वीज मंडळे तोट्यात गेली हे काही माझे एकट्याचे दुःख नाही. भारताच्या प्रत्येक राज्याचा ऊर्जामंत्री माझ्यासारखेच अश्रू ढाळतो आहे. मग तिथे सरकार कुठल्याही पक्षाचे असो. अशावेळी विजेचे दिवे बंद करायला लावणे म्हणजे “आधीच उपाशी, त्यात सक्तीची एकादशी” असला अचरट प्रकार झाला’, असल्याचे डॉ. राऊत म्हणाले.

First Published on: April 4, 2020 10:57 PM
Exit mobile version