COVID-19 App: जे नागपूर मनपाला जमले ते राज्याला का जमू नये?

COVID-19 App: जे नागपूर मनपाला जमले ते राज्याला का जमू नये?

नागपूर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करोनासाठी तयार केले App

डोळ्यांना न दिसणाऱ्या एका करोना नामक विषाणूने सध्या जगभरातील ७ अब्ज लोकसंख्येला चांगलाच घाम फोडलाय. चीन पासून ते अमेरिकेपर्यंत अनेक विकसित देश या व्हायरसमुळे हैराण झाले आहेत. तर भारतात देखील या विषाणूचा शिरकाव झालेला आहे. भारत आपल्या पद्धतीने या व्हायरसशी लढत असताना तिकडे नागपूर महानगरपालिकेने मात्र एक पाऊल सर्वांच्या पुढे टाकले आहे. मनपाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्र सरकारच्या एचएलएल लाईफकेअर या कंपनीच्या मदतीने COVID- 19 App ची निर्मिती केली आहे. या Appच्या मदतीने ज्या नागरिकांना कफ, ताप किंवा श्वास घेण्यास अडचण निर्माण होत आहे, अशा रुग्णांपर्यंत डॉक्टारांना विनासायास पोहोचता येणार आहे.

सध्या या App ची लिंक व्हॉट्सअपद्वारे व्हायरल करण्यात येत आहे. काही तासांनंतर ते अँड्राईड प्ले स्टोअरवर हे App उपलब्ध होईल. नागपूर शहरातील लोकांना या Appचा फायदा होत आहे. ज्या लोकांना करोनाची लक्षणे आहेत, त्यांनी या Appवर माहिती टाकल्यास महानगरपालिकेचे डॉक्टर स्वतःहून रुग्णापर्यंत पोहोचत आहेत. App डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये स्वत:च्या आजाराविषयी माहिती भरण्याचे आवाहन करण्यात येते. संपूर्ण माहिती भरल्यावर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर सदर भरलेल्या माहितीच्या आधारे कोव्हिड-१९ ची लक्षणे असल्यास मनपाच्या डॉक्टरांना त्याची माहिती मिळते. त्या माहितीच्या आधारे मनपाचे डॉक्टर रुग्णाशी संपर्क करुन पुढील कार्यवाही करतात.

मनपाला जमते मग राज्य सरकारला का नाही?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून मुंबई, ठाणे, पुणे यांची नावे डोळ्यासमोर येतात. नागपूर महानगरपालिका अ वर्गात असली तरी ती तुलनेने लहान आहे. मात्र एका महानगरपालिकेने जो पुढाकार घेतलाय, तो राज्य सरकारला का जमला नाही? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. तुकाराम मुंढे यांनी केंद्र शासनाच्या HLL Life Care या कंपनीसोबत करार करुन हे App तयार केले आहे. राज्य सरकारने देखील अनेक आयटी कंपन्यांशी करार केलेला आहे. केंद्र शासनाच्या आयटी कंपन्यांकडून देखील वेळोवेळी राज्य सरकार एखादे सॉफ्टवेअर बनविण्यासाठी करार करत असते. मग करोना सारख्या महामारीला रोखण्यासाठी सरकारने डिजीटल पाऊल का उचलले नाही? हा प्रश्न विचारला जात आहे.

कधी काळी मुंबई महापालिकेचे आयुक्त राहिलेले अजोय मेहता हे सध्या राज्याचे मुख्य सचिव आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात असलेले प्रवीण परदेशी सध्या मुंबई मनपाचे आयुक्त आहेत. नागपूर मनपाच्या धर्तीवर राज्य सरकारने अॅपचा वापर केला तर याचा फायदा ग्रामीण भागााला होईल. तसेच आयुक्त तुकाराम मुंढेंनी घरोघरी जाऊन जशी तपासणी केली होती. त्याची रि अनेकांनी नंतर ओढली आहे. त्यामुळे ज्या मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत, तिथे आयुक्त प्रवीण परदेशी देखील फिल्डवर उतरतील का? असाही प्रश्न विचारला जात आहे.

लॉकडाऊनमध्ये App ठरणार फायदेशीर

देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी खासगी डॉक्टरांनी टाळेबंदी करुन घरीच राहणे पसंत केले आहे. अशापरिस्थितीत जर लोकांना करोनाची लक्षणे असतील आणि मनपाच्या डॉक्टरांना दाखवायचे असेल तर पोलिसांचे सुरक्षा कवच भेदून जावे लागेल. मात्र आपल्या हातात असलेला मोबाईल जर डॉक्टरांना आपल्यापर्यंत आणत असेल तर करोनाला रोखण्यात मदतच होऊ शकते.

केंद्र सरकारनेही आणले करोना कवच App

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. पण तरीही करोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. कारण करोनाची लागण झालेल्या व्यक्तीलाही आपल्याला लागण झाल्याचे उशीरा समजते. यादरम्यान या व्यक्ती अनेक लोकांच्या संपर्कात येतात. ज्यांना पुढे करोनाची लागण होते. यामुळे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकार करोनाग्रस्तांना शोधून काढणारे Corona Kavach App तयार करत आहे. हे App माहिती आणि तंत्रज्ञान विभाग तयार करत आहे. Appची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. असेच App सिंगापुरनेही बनवले असून त्याला TraceTogether App नाव देण्यात आले आहे.

HLL कंपनीबद्दल

एचएलएल ही कंपनी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटंबकल्याण खात्यासोबत सलंग्ण आहे. नवीन लस निर्माण करण्यासाठी ही कंपनी काम करते. मुळची चेन्नईची असलेली या कंपनीने हेपेटाईट बी, मानवी रेबीज अशा रोगाविरोधातल्या लसी निर्माण केल्या आहेत.

First Published on: March 27, 2020 7:58 PM
Exit mobile version