राणेंचा ‘स्वाभिमान’ भाजपात होणार विलीन

राणेंचा ‘स्वाभिमान’ भाजपात होणार विलीन

गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये येणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, आता आणखी एका मेगाभरतीचा कार्यक्रम मुंबईमध्ये होणार आहे. या मेगाभरतीमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या मेगाभरतीत नारायण राणे यांच्या नावाची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. ही मेगाभरती ऐन गणपतीमध्ये होण्याची शक्यता असल्याचे एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या भाजपमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक विद्यमान आमदार येण्यास इच्छुक असून, आता आणखी किती जणांना प्रवेश द्यायचा? असा प्रश्न भाजपातील वरिष्ठांना पडला आहे. आता जी मेगा भरती होईल त्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश असेल, असे देखील या नेत्याने सांगितले.

हेही वाचा – उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा, नारायण राणेंनी दिल्या कानपिचक्या!

युती तुटली तर कोकणात भाजपला राणेंचा फायदा

नुकतेच नारायण राणे यांनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होईल. असे सुतोवाच केले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राणेंना भाजपमध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या मेगा भरतीमध्ये नारायण राणेंचा देखील समावेश असणार असल्याची माहिती मिळत आहे. एवढेच नाही तर राणेंसोबत आमदार नितेश राणे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जर युती तुटली तर नारायण राणे यांचा फायदा कोकणात भाजपला करून घ्यायचा असून, राणेंना कुडाळ-मालवण, तर त्यांचे पूत्र नितेश राणे यांना कणकवलीमधून भाजपाकडून तिकीट मिळणार आहे. एवढेच नाही तर सावंतवाडी मतदारसंघातून भाजप राजन तेली यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तळकोकणात जर युती झाली नाही तर शिवसेनेला कसे आव्हान देता येईल? यासाठी भाजप तयारी करत आहे.

सप्टेंबरमध्ये ‘या’ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह सष्टेंबरच्या मेगा भरतीमध्ये  सिद्धाराम म्हेत्रे-अक्कलकोट,  भारत भालके-पंढरपूर, बबनदादा शिंदे- माढा, औरंगाबाद, जयकुमार गोरे(माण) -सातारा, गोपालदास अग्रवाल-गोंदिया, सुनील केंदार (सावनेर) यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. या सर्वांचा प्रवेश हा ऑगस्ट महिन्यात होणार होता मात्र मुख्यमंत्र्यांची सुरु असलेली जन आशिर्वाद यात्रा तसेच भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचे निधन त्यामुळे हा मेगा भरतीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा संपल्यानंतर म्हणजेच सप्टेंबर महिन्यात हा मेगा भरतीचा कार्यक्रम मुंबईत पार पडेल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

येणाऱ्या १० दिवसात भाजपबाबत निर्णय घेईन. या १० दिवसांनंतर भाजपात असेन की महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चालवायचा यासंबंधी चित्र स्पष्ट होईल. भाजपने मला काही कमिटमेंट दिल्या आहेत, ज्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. येत्या चार-पाच दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला याबाबत सांगतील. त्यानंतर मी माझा निर्णय घेईन.
– नारायण राणे, खासदार
First Published on: August 26, 2019 7:36 PM
Exit mobile version