दानवे – खोतकरांमधील चर्चेवर तोडगा नाहीच!

दानवे – खोतकरांमधील चर्चेवर तोडगा नाहीच!

लोकसभा उमेद्वारीवरुन नाराज झालेल्या अर्जुन खोतकरांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती केली. खोतकरांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना खोतकरांकडे पाठवले होते. मात्र, त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरल्याचे भेटीनंतर समोर आले आहे. खोतकर आणि दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी बंद दाराआड झालेल्या चर्चेतून अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याची माहिती मिळते आहे. या चर्चेनंतरही खोतकर दानवे यांच्या विरोधात लोकसभा लढण्यावण्याच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे गुंता अधिकच वाढला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीमुळे दानवे आणि खोतकर यांच्यातील या विशेष बैठकीकडे सर्वांचच लक्ष लागून राहिले होते.

नेमका वाद काय?

खोतकर यांनी दानवे यांच्या विरोधात जालन्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ही सेना-भाजपच्या युतीनंतर खोतकर ही घोषणा मागे घेतील अशी चर्चा रंगली होती. मात्र, दानवेंविरोधात निवडणूक लढवणार या निर्णयावर खोतकर ठाम राहिले. त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं. दरम्यान, त्यांच्यातील हा वाद मिटावा यासाठी भाजपकडून हालचाली सुरु झाल्याचं समजत आहे. याच कारणास्तव सुभाष देशमुख यांनी जालना येथे खोतकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दानवे स्वत: त्यांच्यासोबत होते. या तिनही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चेअखेरी कोणताच ठोस तोडगा निघाला नाही.

कुणाची काय प्रतिक्रिया?

खोतकर हे पक्के शिवसैनिक आहेत. ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत. आता युती झालेली असल्यामुळे लवकरच दानवे व खोतकर जालन्यात युतीचं काम सुरू करतील – सुभाष देशमुख, सहकारमंत्री
आमच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल की आमच्यातील वाद मिटले आहेत – रावसाहेब दानवे, खासदार व भाजप प्रदेशाध्यक्ष
देशमुख मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण घेऊन आले होते. त्यांना सगळं काही सांगितलंय. मी लोकसभेतून माघार घेतली नाही. आता जालन्यात एकत्र निवडणूक लढवायची की नाही याचा अंतिम निर्णय, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर घेतील. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल – अर्जुन खोतकर, राज्यमंत्री
First Published on: March 4, 2019 2:13 PM
Exit mobile version