निसर्गरम्य स्थळी आता पर्यटकांना बंदी

निसर्गरम्य स्थळी आता पर्यटकांना बंदी

निसर्गरम्य स्थळी आता पर्यटकांना बंदी

त्र्यंबकेश्वर : पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने होणारी गर्दी व पर्यायाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वन विभागाने पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रतिबंध घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आला आहे.

ञ्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील वन विभागाच्या अखत्यारीत बहुतांश पर्यटनस्थळांचा समावेश आहे. ब्रह्मगिरी आणि गंगाद्वार पर्वत, दुगारवाडी धबधबा, अंजनेरी गड, हरिहर किल्ला अशा काही पर्यटनस्थळांवर पावसाळ्यात नेहमीच गर्दी होत असते. विशेष करून मुंबईहून अधिक पर्यटक येत असतात. हरिहर किल्ल्यावर होणारी गर्दी आणि संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेत गतवर्षी वन विभागाने पावसाळ्यात या किल्ल्यावर जाण्यास मनाई केली होती. दुगारवाडी येथे एकाच वेळेस तीन युवकांचा बुडून मृत्यू झाला होता. पहिने परिसरात डोहात बुडण्याच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत. जेथे शक्य आहे तेथे वन विभागाने गेट बंद करून पर्यटकांना रोखले आहे. अंजनेरी गड, ब्रम्हगिरी अशा काही ठिकाणी फाटक लावण्यात आले आहेत. दुगारवाडी येथे जाण्यास एकापेक्षा अधिक रस्ते असल्याने तेथे स्थानिक वन व्यवस्थापन समितीच्या मदतीने पर्यटकांना रोखण्यात येते. वन विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने निसर्ग सहलीच्या नावाने धुडगूस घालणार्‍यांना आवर घालण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. शनिवार-रविवारीही याठिकाणी येत हुल्लडबाजी करणार्‍यांना रोखण्यासाठी आता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे. पहिने परिसरातील हॉटेल बंद करण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन खात्याने वाहन तपासणीची मोहीम राबविल्यास नाहक भटकंती करणार्‍यांना आळा बसू शकेल.

सहकार्याची अपेक्षा

कोविड 19 च्या संसर्गाचा धोका लक्षात घेता पर्यटकांना येण्यास बंदी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक निसरडे असलेल्या ठिकाणी बंदी असते. यावर्षी सर्वच ठिकाणी बंदी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.
– कैलास आहिरे, वन परिक्षेत्र अधिकारी, त्र्यंबकेश्वर

First Published on: June 19, 2020 9:11 PM
Exit mobile version