नाशिकमध्ये तुर्त लॉकडाऊन नाही : भुजबळ

नाशिकमध्ये तुर्त लॉकडाऊन नाही : भुजबळ

कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी तूर्तास जिल्हयात लॉकडाऊन करण्यात येणार नाही. परंतु नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. रूग्णसंख्या वाढली तर मात्र लॉकडाउनबाबत पुर्नविचार करावा लागेल असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. नागरिकांनी बंधने टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही भुजबळ यांनी यावेळी केले.

राज्यात कोरोनाचा धोका वाढू लागल्याने राज्याच्या अनेक भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकमध्येही पुन्हा लॉकडाऊन होणार का याविषयी नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आज नाशिक दौर्‍यावर असलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी संवाद साधला यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही. लॉकडाऊन करणे नागरिकांना आणि शासनाला देखील परवडणारे नाही. मात्र रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र यावर पुनर्विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात आहे. जर नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले. मास्क आणि सॅनिटायजरचा वापर नियमित केला तरच हे शक्य आहे. अन्यथा शासनाला याचा पुनर्विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नियमांचे पालन करून संमेलन होणार
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामध्ये नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनासाठी महिना भराचा कालावधी बाकी आहे. यासाठी काटेकोर पद्धतीने नियोजन करण्यात येत असून साहित्य संमेलनाच्या ठिकाणी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येईल. या कार्यक्रमस्थळी मास्क शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच याठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येऊन गर्दी होणार नाही याचे काटेकोर नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

First Published on: February 19, 2021 1:05 PM
Exit mobile version