नाशिकमध्ये तुर्तास लॉकडाऊन नाही : भुजबळ

नाशिकमध्ये तुर्तास लॉकडाऊन नाही : भुजबळ

नाशिकमध्ये सध्या तरी लॉकडाऊनची गरज नाही, करायचा असल्यास पूर्वसुचना देऊनच निर्णय घेऊ असे सांगत होम क्वारंटाइन असलेल्या रूग्णांकडून नियमावलीचा भंग केला जात असेल तर त्यांना कोविड केअर सेंटरला आणण्यात येईल. रूग्णालयात बेडस मिळत नसल्याने रूग्णांचे हाल होत आहे त्यामुळे खाजगी रूग्णालयातील ८० टक्के बेडस अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या बैठकीत दिले. तसेच पुढील तीन दिवसांत जिल्हा रूग्णालयात ३०० बेडसची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगत पुन्हा सोमवारी (दि.५)आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकमधील वाढती कोरोना रूग्णसंख्या लक्षात घेता एक आठवडा निर्बंध यांची सकती करण्याचा निर्णय मागील बैठकीत घेण्यात आला होता. या परिस्थितीत नागरिकांनी सहकार्य न केल्यास २ एप्रिल रोजी लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येईल असा इशारा पालकमंत्री भुजबळ यांनी दिला होता. त्यानूसार गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, आज जिल्हयातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. रूग्णालयात बेडस मिळत नसल्याने रूग्णांचे हाल होत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत यापुढे खाजगी रूग्णालयातील ८० टक्के बेडस अधिग्रहीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना रूग्णांकडून होम आयसोलेशच्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे याकरीता आता अशा रूग्णांच्या घरी तपासणी करून जर त्यांची स्वतंत्र व्यवस्था नसल्यास त्यांना कोविड केअर सेंटरला आणण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. तुर्तास पोलीस आयुक्त तसेच पोलिस अधिक्षकांनी रस्त्यावर उतरून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात एक खाजगी रूग्णालय अधिग्रहीत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. रूग्णांना बेड मिळावे याकरीता तातडीने उपाययोजना करण्याचे आदेशही देण्यात आले असून सोमवारी मी स्वतः पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पांडेय, मुख्याधिकारी लीना बनसोड, ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, अन्न, औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त डॉ.माधुरी पवार, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निखिल सैंदाने, डॉ.प्रशांत खैरे, डॉ.अनंत पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित आहेत.

काय आहेत निर्देश
* कोरोना रूग्णांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास कोविड सेंटरला आणणार.
* प्रत्येक तालुक्यात एक खाजगी रूग्णालय अधिग्रहीत करणार.
* खाजगी रूग्णालयात ८० टक्के बेड अधिग्रहीत करणार
* एका रूग्णामागे १० जणांचे ट्रेसिंग करणार.
* जिल्हा रूग्णालयात ३०० बेडसची व्यवस्था करणार
* जिल्हा रूग्णालयात १०० व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था
* बिटको रूग्णालयात बेड वाढविण्याचे आदेश.
* जिल्हयात २८८ व्हेंटीलेटर बेडस उपलब्ध.
* आठ दिवसांत १ हजार बेडसची व्यवस्था करण्याचे निर्देश.
* जिल्हाधिकारी, सीईओ यांनी प्रत्यक्ष भेटी द्याव्यात.
* सोमवारपर्यंत सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश.

बेफिकीरी दाखवली गेली
गेल्या महिन्यात विवाहसोहळयांमुळे कोरोना रूग्णसंख्या वाढली. त्याचवेळी आमच्या अधिकार्‍यांनी कारवाई केली असती तर नियंत्रण मिळवणे शक्य होते आमच्या अधिकार्‍यांनी कारवाई करू की नको या विचाराने बेफिकीरी दाखवली हे नाकारून चालणार नाही. परंतु सुदैवाने आता अधिकारी कामाला लागले आहेत. मात्र लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही आठ दहा दिवस आपण बंद करू पण यामुळे अर्थचक्र थांबेल. अनेकांच्या रोजगाराचा, रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो. किमान महीनाभर लॉकडाऊन करावे लागेल. इतके दिवस बंद केले जर मग इतर परिस्थितीचाही विचार करावा लागेल. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू याकत नाही असे ते म्हणाले.

 

यावेळी यंत्रणेच्या उदासिनतेबाबत भुजबळांनी नाराजी व्यक्त करत गतवर्षी ज्या पध्दतीने उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या त्या पध्दतीने पुन्हा उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश देत त्यांनी अधिकार्‍यांनी कामात सुधारणा करा असे खडे बोल सुनावले. रूग्णालयांकडून आकारण्यात येणार्‍या बेसुमार बिलांबाबत यापुर्वीही लेखापरिक्षक नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अद्यापपर्यंत ही यंत्रणा उभारली की नाही हे तपासावे लागेल याबाबत काही तक्रार असल्यास थेट माझ्याकडे करा असेही भुजबळ म्हणाले. तसेच यंत्रणेला तातडीने रूग्णालयांमध्ये लेखापरिक्षक नियुक्तीचे आदेश त्यांनी दिले.

First Published on: April 1, 2021 8:17 PM
Exit mobile version