परमबीर सिंह यांना संरक्षण देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

परमबीर सिंह यांना संरक्षण देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सुप्रीम कोर्टाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना संरक्षण देणारी याचिका फेटाळून लावली आहे. तुम्ही कुठे आहात हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत संरक्षण मिळणार नाही, असे कोर्टाने सांगितले. तर, मला मोकळा श्वास घेण्याची परवानगी मिळाली तर मी खड्ड्यातून बाहेर येईन, अशी प्रतिक्रिया परमबीर सिंह यांनी दिली आहे.

परमबीर सिंह यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेतून सिंह यांनी संरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, कोर्टाने हे संरक्षण देण्यास नकार दिला आहे. सिंह कुठे आहेत हे जोपर्यंत सांगितले जात नाही तोपर्यंत त्यांना संरक्षण दिले जाणार नाही. ते देशात आहेत? देशाच्या बाहेर आहेत? की आणखी कुठे आहेत? असा सवाल कोर्टाने केला. न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी हा सवाल केला. तुम्ही कोणत्याच चौकशीत सामिल झाला नाहीत. तरीही तुम्हाला संरक्षणाचा आदेश हवा आहे.

आमची शंका चुकीची असू शकते, पण तुम्ही जर परदेशात असाल आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची वाट पाहत असाल तर आम्ही तुम्हाला संरक्षण कसे देऊ शकतो? असा सवाल कोर्टाने केला. तसेच तुम्ही कुठे आहात हे 22 नोव्हेंबर रोजी सांगा, असेही कोर्टाने म्हटले आहे. या सर्व प्रकरणावर परमबीर सिंह यांनी तुम्ही श्वास घेण्यास मोकळीक दिली तर मी खड्ड्यातूनही बाहेर येईन, असे सांगितले आहे. आता या प्रकरणावर 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

खोट्या एफआयआरच्या माध्यमातून माझी प्रचंड छळवणूक केली, असा आरोप करत पोलीस अधिकार्‍यानेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात सिंह यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून असलेला दिलासा 21 ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आला होता.

First Published on: November 19, 2021 8:15 AM
Exit mobile version