जायकवाडी धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडले

जायकवाडी धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडले

शेवगाव – तुडुंब भरलेल्या जायकवाडी धरणात वरील भागातून येणार्‍या पाण्याची आवक वाढल्याने बुधवारी सकाळी धरणाचे अठरा दरवाजे उघडून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. मात्र रात्री अचानक पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने रात्री दिड वाजता धरणाचे सर्वच सत्तावीस दरवाजे उघडून ८९ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग गोदावरीत सुरु करण्यात आला होता.

मात्र दुसर्‍या दिवशी पुन्हा आवक कमी झाल्याने दुपारी बारा वाजेच्या सुमारास सत्ताविसपैकी आपात्कालीन नऊ दरवाजे बंद करुन दहा ते सत्तावीस या क्रमांकाच्या अठरा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु ठेवण्यात होता. सलग दुसर्‍या दिवशीही धरणाचे अठरा दरवाज्यातून आवकीच्या प्रमाणात विसर्ग सुरुच असून गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजता अठरा दरवाजे दोन फुट उंचावून ३७ हजार ७२८ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु ठेवण्यात आलेला आहे.

सध्या धरणात नागमठाण २९ हजार ३०० क्युसेस, नेवासा ९ हजार ६४४ क्युसेसने पाणी दाखल होत आहे. आवक ४५ हजार क्युसेस या वेगाने होत असून पाणीपातळी ९९.१२ टक्के झाली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विजय काकडे, बंडु अंधारे, गणेश खराडकर, राजाराम गायकवाड लक्ष ठेऊन आहेत.

First Published on: October 1, 2021 7:43 PM
Exit mobile version