एका रात्रीत चार घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

एका रात्रीत चार घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील वडगावपान फाटा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ठिकाणी घरफोड्या करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. रविवारी ( दि. २ ) रात्री २.३० ते ३ वाजेच्या सुमारास या घरफोडीच्या घटनांमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

वडगावफाटा परिसरात राहणारे संजय माधव थोरात यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत आत प्रवेश केला आणि साहित्याची उलथापालथ केली. संजय थोरात यांची भावजय स्वाती जयराम थोरात यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने तसेच, घरातील दीड तोळे सोन्याचे दागिने व ८ भार चांदीचे दागिने आणि ५०० रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. यावेळी चोरट्यांनी घरातील सदस्यांना धमकावले. त्यानंतर चोरट्यांनी प्रमोद शिवाजी थोरात व गणेश संपत थोरात यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रहिवाशी जागे झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर वडगावपान विद्यालय परिसरात राहणारे बाळासाहेब दत्तात्रय थोरात यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत साहित्याची उलथापालथ केली.

सदर घरातून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व ३० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. तोपर्यंत परिसरातील रहिवाशी जागे झाले होते. वडगावपान युवक काँग्रेसचे अध्यक्ष नीलेश थोरात, सतीश थोरात, भूषण थोरात, संजय थोरात, महेश थोरात, जयराम थोरात, प्रमोद थोरात, सोमनाथ थोरात, सलमान शेख, सचिन रणधीर, नितीन गायकवाड, अनिस तांबोळी सहित युवकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरटे अंडरवेअर व बनियनवर होते, असे नीलेश थोरात यांनी सांगितले. याबाबत संगमनेर तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस कर्मचारी विष्णू आहेर यांनी घटनास्थळी येवून माहिती घेतली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले. वडगावपान फाटा परिसरात एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

First Published on: January 3, 2022 9:00 AM
Exit mobile version