2 -3 लाखाच्या मताधिक्यांनी यश मिळेल; उमेदवारी मिळाल्यावर हेमंत गोडसेंकडून विश्वास व्यक्त

नाशिक : मागच्या महिनाभरापासून महायुतीमध्ये कळीचा मुद्दा ठरलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबतचा तिढा आज सुटला आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना अखेर नाशिक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना तिसऱ्यांदा नाशिकमधून उमेदवारी मिळाली आहे. हेमंत गोडसे यांनी याआधी 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत नाशिकमधून विजय मिळवला होता. त्यांची लढत आता महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी होणार आहे. त्यामुळे हेमंत गोडसे याचंचे तिसऱ्या निवडणूक जिंकत विजयाची हॅटट्रिक करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, उमेदवारी मिळाल्यावर 2 -3 लाखाच्या मताधिक्यांनी यश मिळेल, असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे. (Lok Sabha Election 2024 Nashik constituency Hemant Godse)

उमेदवारी मिळाल्यावर माध्यमांशी बोलताना हेमंत गोडसे म्हणाले की, महायुतीच्या अनेक ठिकाणी जागासंदर्भात तिढा होता. कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटणार हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये होता. 4 ते 5 जागांमध्ये नाशिक देखील अडकलं होतं. पण मला असं वाटतं ही शिवसेनेची ही पारंपारीक जागा होती, त्यामुळे आम्हाला मिळाली आहे, असे हेमंत गोडसे यांनी म्हटले.

गेली 10 वर्ष मी या मतदारसंघात नेतृत्व करत असून ग्रामीण किंवा शहरी भाग असेल मी लोकांपर्यंत पोहचलो आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मतदारसंघाची एक फेरी केली होती. त्यानंतर महिनाभरामध्ये पत्रकं असतील किंवा घरोघरी जाण्याचं काम सर्वच कार्यकर्त्यांनी केलं आहे. त्यामुळे ज्या माणसाकडे डेव्हलपमेंटचं व्हिजन असेल त्या उमेदवाराला नाशिककर मत देतील. मला विश्वास आहे की, 2 ते 3 लाखाच्या मताधिक्यांनी मला यश मिळेल, असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.

हेमंत गोडसे मतदारांना आव्हान करताना म्हणाले की, आज देशामध्ये मोदींच्या रुपाने कणखर नेतृत्व मिळालं आहे. आपला देश हा आर्थिक विकासाच्या दिशेने चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व नेते सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू माणून चांगल काम केलं आहे. मी देखील एक उमेदवार म्हणून गेल्या 10 वर्षांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे विश्वास आहे की, येणाऱ्या काळामध्ये आमचे सर्वच पक्षच भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई असेल, सर्वांच्या एकजुटीने खूप मोठी ताकद मला याठिकाणी मिळणार आहे, असेही हेमंत गोडसे म्हणाले.

Edited By – Rohit Patil

First Published on: May 1, 2024 2:01 PM
Exit mobile version