महागाईचा बार : फटाक्यांच्या किमतीत वाढ

महागाईचा बार : फटाक्यांच्या किमतीत वाढ

वाडा : एकेकाळी वाडा कोलमसाठी प्रसिद्ध असलेल्या वाडा शहराची आता फटाक्याची होलसेल बाजारपेठ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे फटाक्यांची विक्री मंदावली होती; यंदा मात्र फटाक्यांच्या बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड उडाली आहे. फटाक्यांच्या दरातही 25 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये फटाके विक्रीची अनेक दुकाने असली तरी वाड्यातील फटाके हे इतरांपेक्षा स्वस्त असल्याने वाड्यातील फटाके विक्रेत्यांच्या दुकानांवर घाऊक व किरकोळ फटाके विक्रेत्यांची फटाके खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. सुरक्षितेच्या कारणास्तव ही दुकाने वाडा शहरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर वाडा त्रिंबकेश्वर रोडवरील देसई गावाच्या हद्दीत थाटली आहेत. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, नगर, रत्नागिरी, नाशिक, नवी मुंबई या ठिकाणांहून व्यापारी खरेदीसाठी येथे येतात.

दक्षिण भारतातील तामिळनाडू येथील शिवकाशी येथील स्टॅण्डर्ड या कंपनीतून फटाके येत असून मल्टिशॉट, मल्टिबार, हँडरेड शॉट, रोबोट डान्सिंग, फोटो फ्लॅश, चक्री, रॉकेट, फुलबाजा, फुलझाडी, अनार, लवंगी, सुतळी बॉम्ब, लायटिंग थंडर, 500, 1000, 2000 ची माळ अशा विविध प्रकारच्या फटाके येथे उपलब्ध असून 50 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे. गेल्या वर्षी मागील वर्षीपेक्षा यावर्षी फटाक्यांचे दर 25 टक्क्यांनी वाढले आहेत, अशी माहिती दिलीप ट्रेडर्डचे मालक दिलीप पातकर यांनी दिली.

First Published on: October 27, 2021 8:15 AM
Exit mobile version