दूध भेसळ करणाऱ्यांचा पर्दाफाश, दोन अड्डे उद्ध्वस्त

दूध भेसळ करणाऱ्यांचा पर्दाफाश, दोन अड्डे उद्ध्वस्त

अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा परिसरातील जांभळे रोड येथील दूध संकलन करणार्‍या योगेश धोंडीभाऊ चव्हाण याचे घरी आणि दूध संकलन केंद्रावर अकोले पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्तरित्या छापे टाकले. दुधात भेसळ करत असताना त्याला रंगेहात पकडले. यावेळी भेसळयुक्त दूध बनवण्याचे दोन्ही अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या धडक कारवाईत एकूण ८० हजार ६७० रुपयांचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. यामुळे दूध भेसळ करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ब्राम्हणवाडा परिसरातील जांभळे रोड, ब्राम्हणवाडा येथील शिंदेवाडीतील योगेश चव्हाण हा दुधात भेसळ करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन चव्हाण याचे घरी बुधवारी (दि. २२) अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे व त्यांचे पथक, अकोलेचे प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक बी. बी. हांडोरे यांच्या सयुंक्त पथकाने छापा मारला. तेथे 28 लिटर 700 रुपयांचे बनावट दूध, दुधामध्ये भेसळ करण्यासाठीचे 15 लिटर लिक्विड 2025 रुपयांचे व दोन प्रकारच्या पावडर 371 किलो 52 हजार 432 रुपये असा एकूण 55 हजार 720 रुपयांचे बनावट दूध बनविण्याचे साहित्य जप्त केले. तसेच त्याचे मालकीचे मे. संघ केंद्र शिंदेवाडी याने तयार केलेले 998 लिटर 24950 रुपयांचे दूध असे एकूण 80 हजार 670 रुपयांचे भेसळीचे दूध व साहित्य असे जप्त केले आहे. तेथून तपासणीसाठी नमुने घेऊन उर्वरित दुधाचा साठा नष्ट केला. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचनामा करुन मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक बी. बी. हांडोरे, पो. ना. बाबासाहेब बढे, विठ्ठल शरमाळे, रवींद्र वलवे, गोविंद मोरे, गणेश शिंदे, राहुल क्षीरसागर यांसह एफडीए अधिकारी राजेश बढे, पवार, सूर्यवंशी यांनी केली.

First Published on: September 24, 2021 4:47 PM
Exit mobile version