एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे नाशिकमध्ये बसेसच्या दोन हजार फेर्‍या रद्द

एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे नाशिकमध्ये बसेसच्या दोन हजार फेर्‍या रद्द

नाशिक – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अवघे अडीच हजार रुपये बोनस आणि ५ टक्के महागाई भत्ता लागू केल्याच्या निषेधार्थ एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांनी दोन दिवसांपासून सुरु केलेला संप गुरुवारी (दि. २८) उशीरापर्यंत सुरू होता. नाशिक जिल्ह्यात महामंडळाची एकही बस न धावल्याने दिवसभरात सुमारे दोन हजार फेर्‍या रद्द झाल्याने महामंडळाचे ७० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, बुधवार (दि. २७) पासून महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचार्‍यांचा ठिय्या कायम आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना वार्षिक ३ टक्के वेतनवाढ ठरलेली असताना सरकारने ती लागू केलेली नाही. राज्य सरकारच्या तुलनेत एसटीच्या कर्मचार्‍यांना तुटपुंजे वेतन आणि भत्ते मिळतात. यात वाढ करण्यासाठी राज्यातील कर्मचार्‍यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला. पोलिसांनी या उपोषणास परवानगी नाकारल्याने त्याचे रुपांतर आता संपात झाले आहे. यामध्ये चालक, वाहकांसह इतर कर्मचारीही सहभागी झाल्याने एसटीची चाके रुतली आहेत. बुधवारी काही प्रमाणात बसेस धावल्या. मात्र, आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यासाठी एसटीचा कणा असलेल्या चालक व वाहकांनीही यात सहभाग घेतल्याने बसस्थानकांवर शुकशुकाट पसरला होता.

शहरातील महामार्ग बसस्थानक, सीबीएस, जुने सीबीएस या महत्वाच्या बसस्थानकांवर प्रवाशी येवून परत जात होते. दरम्यान, एसटी महामंडळाच्या सर्व बसेस स्थानकांमध्ये व डेपोतच उभ्या असल्याने लालपरी रुसल्यासारखे चित्र स्थानकांवर दिसून आले. याविषयी त्वरीत तोडगा काढण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

खासगी वाहतूकदारांची चांदी

महामंडळाची बससेवा बंद असल्याने खासगी वाहतूकदारांची चांदी झाल्याचे दिसून आले. बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना बसेस बंद असल्याचे समजल्यावर खासगी वाहनाने जावे लागले. त्यांच्याकडून जास्त प्रवास भाडे आकारण्यात आल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली आहे.

First Published on: October 28, 2021 9:09 PM
Exit mobile version