नोटप्रेसमधील चलनी नोटांची थांबलेली छपाई पुन्हा सुरू

नोटप्रेसमधील चलनी नोटांची थांबलेली छपाई पुन्हा सुरू

प्रेस कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले असून मागण्या मान्य होई पर्यंत काळ्या फिती लावून आंदोलन करणार असल्याची माहिती मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी दिली. दरम्यान खा. हेमंत गोडसे यांनी या विषयी दिल्लीतील प्रेस महामंडळाच्या अधिका-यांशी चर्चा केली होती.

इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस मध्ये नव्याने नियुक्त झालेल्या मुख्य महाप्रबंधक बोलेवर बाबू व व्यवस्थापनाच्या मनमानी आणि कामगार विरोधी प्रेस कामगार संघटनांनी मंगळवारी (दि.३१) काम बंद आंदोलनाला सुरुवात केली होती, बुधवारी (दि.१) व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात चर्चा झाली, यात कामगार युनियनला विचारात घेतल्या शिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही, कामगारांच्या सेवा शर्तींना धक्का लावणार नाही, पाच लाख रुपयांच्या नोट गहाळ प्रकरणी निलंबीत कामगारांना लवकरच कामावर घेण्यात येईल, असे आश्वासन करन्सी नोट प्रशासनाने दिल्याची माहिती जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी दिली.

यावेळी करन्सी नोट प्रेसचे मुख्य महाप्रबंधक बोलेवर बाबू, महाप्रबंधक एस. महापात्रा, सहायक महाप्रबंधक वाजपेयी, नवीन कुमार, अर्पित धवल, दिपक पडवळ, कामगार संघाचे जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुन्द्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, स्टाफ युनियचे सरचिटणीस अभिजीत आहेर, दिपक शर्मा, मनोज चिमणकर, आदी उपस्थित होते. दरम्यान खा. हेमंत गोडसे हे दिल्लीत असल्याने त्यांनी या प्रश्नी प्रेस महामंडळाच्या व्यवस्थापनाशी चर्चा करुन तत्काळ तोडगा काढण्याविषयी चर्चा केली, यामुळे व्यवस्थापन व कामगार संघटनांत यशस्वी चर्चा होईन आंदोलन मागे घेण्यात आल्याचे समजते.

काम बंद आंदोलन थांबवले असले तरी नोट प्रेस मधील विविध विषयांसह देशातील नऊ प्रेस मधील मागण्याची नोटीस व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. व्यवस्थापनाने कबूल केलेल्या मागण्या मान्य होई पर्यंत जेवणाच्या सुट्टीत काळ्या फिती लावून आंदोलन सुरुच राहणार आहे.
जगदीश गोडसे जनरल सेक्रेटरी, प्रेस मजदूर संघ

First Published on: September 1, 2021 9:10 PM
Exit mobile version