आता मंत्र्यांच्या खातेवाटपाची उत्सुकता; वजनदार खाती भाजपकडे राहणार

आता मंत्र्यांच्या खातेवाटपाची उत्सुकता; वजनदार खाती भाजपकडे राहणार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार पार पडल्यानंतर आता मंत्र्यांच्या खातेवाटपाची उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्रिपद स्वतः शिंदे यांच्याकडे असल्याने वजनदार खाती भाजपकडे राहणार हे निश्चित असून, खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांना कोणती खाती मिळणार याबाबत चर्चा रंगली आहे.

शिंदे गटाकडे नगरविकास, सामान्य प्रशासन, विधी आणि न्याय, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम), कृषी, उद्योग, परिवहन, मराठी भाषा विकास, वने आणि पर्यावरण, पर्यटन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, रोहयो, फलोत्पादन, जलसंधारण, उच्च आणि तंत्रशिक्षण, ही खाती राहण्याची दाट शक्यता आहे. तर भाजपकडे गृह, महसूल, वित्त आणि नियोजन, ग्रामविकास, उर्जा, जलसंपदा, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सहकार, पणन  ही खाती राहू शकतील.

खुद्द एकनाथ शिंदे हे स्वतःकडे नगरविकास, सामान्य प्रशासन आणि  सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) ही खाती स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. उदय सामंत यांना उद्योग तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण हे खाते मिळू शकते. गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, तानाजी सावंत यांना महत्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली जाऊ शकते.
फडणवीस यांच्याकडे वित्त
देवेंद्र फडणवीस यांना गृह आणि वित्त यापैकी एक किंवा दोन्ही खाती मिळू शकतात. महसूल खात्यासाठी सुधीर मुनगंटीवार,चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा आहे, गिरीश महाजन यांना जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम,  सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण यापैकी एक किंवा दोन  खाते दिले जाण्याची शक्यता आहे. डॉ. विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास आणि सुरेश खाडे यांना सामाजिक न्याय खाते दिले जाऊ शकते. या जबाबदारीत बदलही होऊ शकतो. मंगल प्रभात लोढा किंवा रवींद्र चव्हाण यापैकी एकाला गृहनिर्माण खाते मिळण्यची दाट शक्यता आहे.

हेही वाचाः बिहारमध्ये सरकार कोसळलं, नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

First Published on: August 9, 2022 7:37 PM
Exit mobile version