कोरोनानंतर आणखी एक संकट; पालघरमध्ये ‘क्रायमिन’ रोगाचा धोका, मृत्यूचे प्रमाण ९ ते ३० टक्के

कोरोनानंतर आणखी एक संकट; पालघरमध्ये ‘क्रायमिन’ रोगाचा धोका, मृत्यूचे प्रमाण ९ ते ३० टक्के

कोरोनानंतर क्रायमिन काँगो तापाचा कहर

पालघर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता गोचिडांमुळे क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर (सीसीएचएफ) या साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या रोगामुळे बाधित झालेल्या जनावरांचे मांस खाल्ल्याने विषाणूची बाधा होण्याची भीती आहे. या रोगावर हमखास आणि उपयुक्त इलाज नसल्याने मृत्यूचे प्रमाण ९ ते ३० टक्के आहे. त्यामुळे सीमा भागातील पशुपालक आणि मांस विक्रेत्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

देशात सध्या कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर (सीसीएचएफ) या नव्या विषाणूजन्य रोगाचे आगमन महाराष्ट्रात होण्याची शक्यता असल्याने सध्या पशुपालकांमध्ये, मांस विक्रेत्यांमध्ये व पशुसंवर्धन अधिकार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा रोग गुजरातमधून महाराष्ट्राच्या सीमेवर असणार्‍या जिल्ह्यात पसरण्याची शक्यता असल्याने पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामार्फत या रोगासंबंधी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. बाधित जनावरांमधून या रोगाचे संक्रमण माणसांमध्ये होत असल्याने गुजरात महाराष्ट्र सीमा भागातील पशुपालकांना या रोगाबाबत जास्त सतर्क व जागरूक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या रोगाचा प्रसार गुजरातमधील काही जिल्ह्यात आढळून आला असून काँगो, इराण, दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी या देशातसुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्याने पालघर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सर्व आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याबाबत निर्देश दिले आहेत.

सदर विषाणूजन्य रोग एका विशिष्ट प्रकारच्या गोचिडाद्वारे एका जनावरांमधून दुसर्‍या जनावरांना होतो. ऑस्ट्रीच, शहामृग या पक्ष्याद्वारेदेखील या रोगाचा प्रसार होण्यास मदत होते. बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने व बाधित जनावरांचे मांस खाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव मानवामध्ये दिसून येतो. या रोगाची लागण झाल्यास वेळीच निदान व उपचार न झाल्यास मरण्याची शक्यता 30 टक्के आहे. या रोगावर हमखास व उपयुक्त असे उपचार नसल्याने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर डॉ. प्रशांत कांबळे यांनी दिली.

रोगाची लक्षणे…

या रोगाने बाधित झालेल्या माणसांमध्ये सुरुवातीला डोके दुखणे, जास्त ताप येणे, सांधे दुखी, पोटदुखी उलटी होणे, डोळे लाल होणे, घशात तसेच तोंडाच्यावरच्या भागात फोडी येणे, आजार बळावल्यास त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, नाकातून रक्त येणे अशी लक्षणे दिसून येतात. या रोगावर हमखास इलाज नसल्याने मृत्यूचे प्रमाण 9 ते 30 टक्के असते.

प्रतिबंधक उपाय योजना…

पालघर जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेलगत असल्याने या रोगाचा प्रसार सदर जिल्ह्यात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वेळीच सर्व खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे व या रोगाबाबत तसेच गोचिड निर्मूलनाबाबत योग्य ती काळजी घेऊन सदर आजाराबाबत पशुपालकांनी जागरूक व सतर्क राहणे आवश्यक असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी सांगितले. शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यक यांनी गोठ्याची स्वच्छता राखणे, मुखपट्टी, हॅन्ड ग्लोव्हस, गमबूटचा वापर करणे आवश्यक आहे. सदर रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनमाणसात याबाबत माहिती प्रसिद्ध करणे, गोचिड निर्मूलन कार्यक्रम राबवणे, जनावरांच्या अंगावरील व गोठ्यातील कीटकांचे व गोचिडांचे संपूर्णतः उच्चाटन करणे, बाह्य कीटकांचा व गोचिडांचा नाश करणारी कीटकनाशके यांची फवारणी करणे आवश्यक आहे.

गुजरात राज्यातून पालघर जिल्ह्यात रोज हजारो विविध जनावरांची वाहतूक होत असल्याने दोन राज्याच्या सीमेवर असणार्‍या पशुधन तपासणी नाक्यावर सर्व जनावरांची तपासणी करून आवश्यक त्या उपाय योजना राबवणे. बाधित जनावरे वेगळी काढून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपचार करणे. गोचिडे हाताने काढणे, मारणे कटाक्षाने टाळावे. सदर रोग पशूंचे कच्चे मांस खाल्याने देखील होऊ शकतो. त्यामुळे मांस चांगल्या प्रकारे शिजवून खावे.

First Published on: September 30, 2020 11:22 PM
Exit mobile version