आता व्हायरस आपल्या मागे लागता कामा नये, आपण व्हायरसच्या मागे लागायचे – मुख्यमंत्री 

आता व्हायरस आपल्या मागे लागता कामा नये, आपण व्हायरसच्या मागे लागायचे – मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान!

कोरोनासोबत जगायचे म्हणजे काय करायचं? आमची तयारी आहे, पण कोरोनाची तयारी आहे का आम्हाला त्याच्यासोबत जगू द्यायची? असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये काही दिवसांपूर्वी केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याची  सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवण्यात आली होती. मात्र आता व्हायरस आपल्या मागे लागता कामा नये आपण व्हायरसच्या मागे लागायचे आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी टीका केली आहे. राज्यामध्ये जेव्हा पहिला कोरोना रूग्ण सापडला तेव्हाची आरोग्य व्यवस्था आणि आताची यात जमीन आस्मानचा फरक आहे. यात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. प्रत्येक आरोग्य सुविधा उभारण्यात आणि औषधांच्या वापरात आपण जगाच्या पाठी नाही तर जगाच्या पुढे आहोत. कोविड योद्धांना लढण्यासाठी शस्त्र आणि आयुधं पुरवण्याचे काम आपण करत आहोत. मुंबईत ‘चेस द व्हायरस’ मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतली असे सांगत आता व्हायरस आपल्या मागे लागता कामा नये, आपण व्हायरसच्या मागे लागायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील फेज २ आणि ठाण्यातील कोविड रुग्णालयाचे इ-लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग, कंटेन्मेंट झोनमधली योग्य उपाय योजनांमुळे धारावी आणि मालेगावचा कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यात सरकारला यश आल्याचे देखील त्यांनी सांगितले.

बीकेसी मैदान आणि ठाणे येथे ही दोन्ही रुग्णालये युद्ध पातळीवर उभारण्यात आली आहेत. याचा मला अभिमान आहे. कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र जगाच्या मागे नाही तर पुढे आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईसह राज्यात काही लाख खाटा उपचारासाठी निर्माण केल्या गेल्या ही मोठी गोष्ट आहे. मुंबईमध्ये मोकळ्या मैदानांवर १० ते १५ दिवसांच्या कालावधीत १००० खाटांचे सर्व सुविधायुक्त रुग्णालयांची निर्मिती होते ही कामगिरी थक्क करणारी आहे. देशात अन्यत्र कुठेही अशा प्रकारच्या मोकळ्या मैदानावरील रुग्णालयात आयसीयुची सुविधा उपलब्ध नसल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत.

आपण रुग्णालये आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत मात्र त्याचा वापर करण्याची वेळ कुणावरही येऊ नये, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दाटलोकवस्तीत राहणाऱ्या ५५ वर्षांवरील व्यक्तींनी तपासणी केली जात आहे. त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जात आहे, जेणे अशा व्यक्तींना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वेळीच रोखणे शक्य होईल असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.

असे आहे बीकेसीवरील टप्पा २ रुग्णालय

साधारणता एक महिन्याभरापूर्वी बीकेसी येथील मैदानावर १००० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. त्याच ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात अतिरीक्त १२०० खाटांचे आयसीयु, डायलेसिसीच सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले. त्याचा आज हस्तातरण सोहळा झालाय हे रुग्णालय आज मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आले.  येथे १०८ बेडस् आयसीयूचे असून १२ बेडस् डायलेसिससाठी आहेत. तर ४०६ बेडस् विना ऑक्सिजन आणि ३९२ बेडस् ऑक्सिजन सुविधायुक्त आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये मुंबई महानगरपालिकेकडून रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येत असून,  सद्यस्थितीत ५०० पेक्षा अधिक रुग्ण सदर हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. मागील काही दिवसांपासून दर दिवशी सुमारे ३० रुग्ण निरोगी होऊन घरी परतत आहेत.  डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पिटल (फेज-२) येथे व्हेंटीलेटर मशिन (३०), डायलिसिस मशीन (१८), आय. सी. सी. यु. बेल्स (५ फंक्शन मोटराईझड बेड (१०८), पेशंट वॉर्मर, सिटीस्कॅन मशिन, आर. ओ. सिस्टीम (१२५० LPH ), कॉरंटाईन बेड्स, ऑक्सीजन पाईप लाईनचे कनेक्शन, नॉईसलेस सक्शन, पोर्टेबल एक्स-रे मशीन, ई.सी.जी. मशिन, पल्स ऑक्सीमीटर, कम्प्युटर रॅडिओलॉजी सोल्युशन्स अशा प्रकारचे वैद्यकीय उपकरणे आहेत.

First Published on: June 17, 2020 7:21 PM
Exit mobile version