दरडग्रस्त भागाकडे अधिकार्‍यांची पाठ

दरडग्रस्त भागाकडे अधिकार्‍यांची पाठ

आठ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अलिबाग तालुक्यातील महानवाडी येथील वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या डोंगराचा मोठा भाग शेतकर्‍यांच्या शेतात कोसळून आठ शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. मात्र अद्याप तेथे स्थानिक पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, तसेच वरिष्ठ महसूल अधिकारी पोहचले नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अलिबाग तालुक्यातील खानाव परिसरात वेलटवाडी येथे डोंगर कोसळल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. त्याच वेळी अलिबाग-रोहे रस्त्यापासून पाच किलोमीटरवर असलेल्या महान आदिवासीवाडीवरही डोंगर कोसळला होता. त्यामुळे डोंगराच्या मातीचा ढिगारा खाली येऊन शेतकर्‍यांच्या शेतात पडला. भाया लेंडी, भाग्या लेंडी, जानू काष्टी यांच्यासह अन्य पाच जणांच्या शेतात हा ढिगारा कोसळला आहे.

माती व झाडे-झुडपे शेतात वाहून आल्याने लावलेली शेती नष्ट झाली आहे. पिकत्या शेतात गुडघाभर माती साचल्याने लागवडीची जमीन नष्ट झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात आपत्ती येऊनही महसूल विभागाचा एकही कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी पोहोचलेला नाही. दरम्यान, तलाठी आणि ग्रामसेवक तेथे पोहोचले नसले तरी कृषी विभागाचे कर्मचारी पोहोचल्याचा दावा अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी केला आहे.

First Published on: August 15, 2019 1:05 AM
Exit mobile version