लोकमान्य टिळकांच्या नावाने गाजलेले, आनंद दिघेंनी गौरवलेले ठाण्यातील सर्वांत जुने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

लोकमान्य टिळकांच्या नावाने गाजलेले, आनंद दिघेंनी गौरवलेले ठाण्यातील सर्वांत जुने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

ठाणे – लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर राज्यभर अनेक मंडळे उदयाला आली. त्यापैकीच एक म्हणजे ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य आळी. १९२० साली स्थापन झालेले हे मंडळ गेले १०३ वर्षे नियमित पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदाही कोरोनाच्या खंडानंतर अत्यंत साध्या पण पारंपरिक पद्धतीने उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

हेही वाचा – पुढच्या वर्षी लवकर या! ठाणे जिल्ह्यात तब्बल ४२ हजार बाप्पांना निरोप

मंडालेच्या तुरुंगातून सुटल्यानंतर लोकमान्य टिळकांनी या मंडळाला भेट दिली होती. यावेळी टिळकांनी जोरदार भाषण केलं. त्यामुळे चरईतील या भागाला लोकमान्य अळी असं म्हटलं जातं. लोकमान्य टिळकांना ज्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव अभिप्रेत होता, त्याप्रमाणेच येथील गणेशोत्सव साजरा केला जातो, असं या मंडळाचे अध्यक्ष मयुरेश देव यांनी सांगितलं. पैशांची उधळपट्टी करून मोठाले मंडप उभारण्यापेक्षा अत्यंत साध्या पद्धतीने, लोकांचा सहभाग घेत गणेशोत्सव साजरा केला तर खऱ्या अर्थाने समाजहित साधले जाईल, असे मयुरेश देव म्हणाले.
२०१९ साली या मंडळाने १०० वर्षे पूर्ण केले. त्यावेळी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यानंतर कोरोना संसर्ग वाढल्याने २०२० आणि २०२१ च्या गणेशोत्सवात परंपरा जपण्यासाठी फक्त दीड दिवसांचा गणपती बसवण्यात आला होता. लोकांची सुरक्षा लक्षात घेत आम्ही हा निर्णय घेतला. मात्र, यंदा सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर गणेशोत्सव साजरा होत असल्याने आम्हाला आनंद झाला आहे, असं मंडळाचे खजिनदार उदय पळनीटकर यांनी सांगितंल.

आनंद दिघेंचा आवडता बाप्पा

या मंडळात लोकमान्य टिळकांनी भेट दिली होती. त्याचप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे हे सुद्धा या मंडळाला दरवर्षी आवर्जून भेट द्यायचे. मंडळाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचे. अत्यंत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत असल्याने आनंद दिघे यांनी या मंडळाचा नेहमीच गौरव केला आहे.

हेही वाचा – कल्याणमध्ये शिवसेना पक्षनिष्ठेबाबत देखावा; पोलिसांकडून कारवाई करत सामग्री जप्त

बाप्पाची निघते पालखीतून मिरवणूक

लोकमान्य आळीतील हा बाप्पा सार्वजनिक मंडळाचा असला तरीही येथील नागरिक आपल्या घरगुती बाप्पाप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतात. इतर ठिकाणी किंवा परदेशी स्थलांतरित झालेले नागरिकही गणेशोत्सवासाठी आवर्जून येथे येतात. बाप्पाची मनोभावे सेवा करतात. प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतात. सर्व विधी परंपरेनुसार यथासांग पार पडल्यानंतर विसर्जन मिरवणूकही पारंपरिक पद्धतीने पालखीतून काढली जाते. या पालखी सोहळ्याला स्थानिकांची गर्दी असते.

First Published on: September 7, 2022 3:39 PM
Exit mobile version