ओमायक्रॉनचा देशभर धोका वाढला

ओमायक्रॉनचा देशभर धोका वाढला

सध्या देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन वेगाने पसरत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असताना मध्य प्रदेशात रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दिल्लीत लवकरच निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. इंग्लंड, अमेरिकेत सध्या ख्रिसमस असल्यामुळे सूट देण्यात आली असली तरी त्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्याच्या विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क न घालणार्‍या आमदारांना खडे बोल सुनावत महाराष्ट्रात रात्रीचा लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत.

ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 23 रुग्ण सापडले असून यामध्ये पिंपरी-चिंचवड ७, पुणे मनपा 3 आणि पुणे ग्रामीण ३ तर मुंबई ५, उस्मानाबाद २ तर ठाणे मनपा, नागपूर मनपा आणि मीरा-भाईंदर मनपा प्रत्येकी १ ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला आहे. यामुळे राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 88 झाली असली तरी त्यातील 42 रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 23 रुग्णांपैकी १६ हे आंतरराष्ट्रीय तर ७ जण त्यांचे निकटवर्तींच्या संपर्कातील आहेत.

गुरुवारी सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार उठले आणि त्यांनी मास्क न लावणार्‍या आमदारांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ओमायक्रॉन संसर्ग सर्वत्र वाढत आहे. युरोपात किमान ५ लाख नागरिक ओमायक्रॉनच्या लाटेत मृत्युमुखी पडतील, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. पंतप्रधान नव्या विषाणूने मोठ्या चिंतेत आहेत. ओमायक्रॉनपेक्षा अधिक घातक असा नवा कोरोना विषाणू आला आहे. आपल्याकडे ओमायक्रॉन रुग्ण सर्वत्र आढळू लागले आहेत.

अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी मास्क लावत नसतील तर नागरिकांना काय सांगायचे. जे आमदार सदनात मास्क लावत नाहीत, त्यांना अध्यक्षांनी बाहेर काढले पाहिजे. याची नोंद अध्यक्षांनी घ्यावी, असे अजित पवार म्हणाले. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहाला तशी सूचना केली. फारच त्रास होत असेल तर बोलताना मास्क काढला तर चालेल. मात्र, मास्क प्रत्येक सदस्याने लावला पाहिजे, अशी तंबी जाधव यांनी दिली. त्यानंतर अनेक आमदारांनी खिशात ठेवलेला मास्क आपल्या तोंडावर चढवला.

First Published on: December 24, 2021 6:15 AM
Exit mobile version