फी, बस दरवाढीविरोधात पालक आक्रमक; ७ एप्रिलला शाळा प्रशासन देणार निर्णय

फी, बस दरवाढीविरोधात पालक आक्रमक; ७ एप्रिलला शाळा प्रशासन देणार निर्णय

फी, बस दरवाढीविरोधात पालक आक्रमक

डोबिंवली मधील ओमकार शाळेत बस आणि फी दरवाढ तसेच पुस्तकांच्या किंमतीत वाढ केल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शुक्रवारी शाळेत धडक देत प्रशासनाला जाब विचारला. अखेर ७ एप्रिल रोजी या संदर्भात निर्णय देण्यात येईल, असे आश्वासन शाळा प्रशासनाकडून देण्यात आले. ओमकार शाळेत दरवर्षी फी बस आणि पुस्तकांच्या किंमतीत वाढ केली जात असल्याने पालकांनी या दरवाढीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे, शुक्रवारी तीनशे ते चारशे पालकांनी डोंबिवली येथील शाळेवर धडक दिली.

प्रशासनाला धरले धारेवर

सकाळी आठ वाजता पालक शाळेत गेले होते पण त्यांना अकरा वाजेपर्यंत भेट देण्यात आली नाही. त्यामुळे मनसेच्या विद्यार्थी सेनेने शाळेत धाव घेत शाळा प्रशासनाला धारेवर धरले, असे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सागर जेथे यांनी सांगितले. विद्यार्थांच्या फीमध्ये साधारण पाच हजार रूपये वाढ केली जाते. तसेच बसचेही दहा हजार रूपये तर पुस्तकांच्या किंमतीत एक हजार रूपये वाढ केली जाते, असे पालकांनी सांगितले.

शाळा प्रशासन देणार निर्णय

प्रत्येक वर्षी होणारी दरवाढ रद्द करण्यात यावी असे पालकांचे म्हणणे आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाल्यानंतर बसची दरवाढ करण्यात आली होती, मात्र भाव कमी झाल्यानंतर देखील दरवाढ कमी झाली नाही. उलट प्रत्येकवर्षी बसची दरवाढ केली जात आहे. एकाच कुटूंबातील दोन विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत असल्यास साधारण दीड लाख रूपये शाळेत भरावे लागतात. कायद्यानुसार जास्त फी वाढ करता येत नाही. मात्र कोणतीही फी वाढ करायची असल्यास पीटीए (पालक शिक्षक संघटना) ची माहिती द्यावी लागते. मात्र पीटीए प्रतिनिधीबाबत पालकांना अधिक माहिती नाही, असेही सागर जेथे यांनी सांगितले.

शाळा प्रशासनाने ७ एप्रिलला निर्णय देण्यात येईल असे सांगितले आहे, मात्र फी व बसदरवाढ मागे न घेतल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा सागर जेथे यांनी दिला आहे.

First Published on: March 30, 2019 9:46 AM
Exit mobile version