राष्ट्रपतिपदासाठी राजकारणाबाहेरचा उमेदवार हवा, पवारांच्या नकारानंतर विरोधकांच्या बैठकीत शिवसेनेची भूमिका

राष्ट्रपतिपदासाठी राजकारणाबाहेरचा उमेदवार हवा, पवारांच्या नकारानंतर विरोधकांच्या  बैठकीत शिवसेनेची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाकडून उमेदवार असतील, अशी चर्चा रंगलेली असतानाच शरद पवारांनी हा प्रस्ताव नाकारल्याची माहिती तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शरद पवारांच्या नावाचा आग्रह करीत प्रस्ताव दिल्याचे म्हटले, परंतु सर्वानुमते देण्यात आलेला प्रस्ताव पवारांनी नाकारल्याचे ममता म्हणाल्या. त्यामुळे शरद पवार यांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह असला तरी पवार यांनी नकार दिल्यास राजकीय परिघाबाहेरील सर्वमान्य उमेदवार निवडावा, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपतिपदाचे उमेदवार ठरविण्यासाठी नवी दिल्ली येथे बुधवारी विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान शरद पवार यांनी भूषविले. या बैठकीला माजी पंतप्रधान देवगौडा, ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), मल्लिकार्जुन खर्गे (काँग्रेस), अखिलेश यादव (उत्तर प्रदेश), मेहबूबा मुफ्ती (काश्मीर), सुभाष देसाई (महाराष्ट्र), ई. करीम (केरळ), जयराम रमेश (काँग्रेस), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), टी. आर. बालू (तामिळनाडू), यशवंत सिन्हा (बिहार), रणदीप सूरजेवाला (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), उमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), राजा (तामिळनाडू) आदी 18 नेते उपस्थित होते.

केंद्रातील सत्ताधारी भाजपने घटनेची चौकट मोडण्यास सुरुवात केली आहे. देशाने ७५ वर्षांत जपलेली मूल्ये पायदळी तुडवली आहेत. संविधानिक यंत्रणांचा गैरवापर चालवला आहे. अशा वेळी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपतिपदासाठी एकमुखाने उमेदवार ठरवावा व निवडून आणावा. भाजपविरोधातील पक्षांना एकत्र आणण्याची सुरुवात महाराष्ट्राने केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी ही सुरुवात केली, असे शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले.

केवळ राष्ट्रपती निवडीसाठी नव्हे, तर सर्व विरोधी पक्षांनी एकजूट मजबूत केली पाहिजे. शरद पवार यांनी ही निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यांचा नकार कायम राहिल्यास सर्वसामान्य, उज्ज्वल प्रतिमेचा शक्य झाल्यास राजकीय परिघाबाहेरचा उमेदवार निवडावा. हे देशासाठी प्रतिष्ठेचे पद आहे म्हणून ही निवडणूक महत्त्वाची असल्याची भूमिका शिवसेना नेते तसेच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केली.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी माझे नाव सुचवले, त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्या उमेदवारीचा प्रस्ताव मी नम्रपणे नाकारला, अशी माहिती बैठकीनंतर पवारांनी ट्विट करत दिली.

First Published on: June 16, 2022 6:30 AM
Exit mobile version