बैलगाडी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर…

बैलगाडी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर…

बैलगाडी

राजा सर्जाची घुंगरांचा आवाज करत डौलाने धावणारी जोडी…मामाचा गाव…मातीचा रस्ता…चाकांची खडखड…मुलांचा जल्लौष…त्यावर धावणारी प्रदुषणरहित बैलाची गाडी… ग्रामीण भागात वाहतुकीचे महत्त्वाचे साधन व पर्यायाने तेथील अर्थव्यवस्थेचा एक भाग असलेली ही बैलगाडी आता काळाच्या ओघात इतिहासजमा होण्याच्या मार्गावर धावत आहे, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

शिवारासह नागमोडी वाट असो किंवा सपाट-सखल मातीच्या कच्या रस्तावरुन सुसाट वेगाने धावणारी ग्रामीण भागातील शेतकर्‍याची ‘सुपरफास्ट एक्स्प्रेस’ म्हणजे बैलगाडी, तिचे दर्शन होणे आता अगदी दुर्मीळ होत चालले आहे. तालुक्यात जवळ जवळ शेती व्यवसाय हद्दपार होऊ लागल्यामुळे बैलगाडीचा वापर खूपच कमी झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतीशी निगडित वाहतुकीसाठी बैलगाडीला महत्त्वाचे स्थान होते. घरापुढे बैलगाडी असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे. रस्त्यांचा विकास झालेला नव्हता तेव्हा बैलगाडी हेच दळणवळणाचे प्रमुख साधन होते. देवदेवतांची मिरवणूक असो किंवा नवरदेवाची वरात असो, बैलगाडीलाच अनन्यसाधारण महत्त्व होते. अगदी अलिकडच्या काळात विजयी उमेदवाराची मिरवणूकही सजविलेल्या बैलगाडीतूनच निघत असे.

लाकडाची सुबक, दणकट आणि कलाकुसर करून बैलगाडी बनविण्याचे काम सुतार करीत असत. यासाठी लागणारी चाके व तुब सागाच्या लाकडापासून बनविले जात. ही तुब काढण्यासाठी आतासारखे यंत्र नव्हते, तर ती हाताच्या कलाकुसरीने तयार केली जात असे. बैलगाडी तयार करण्यासाठी होणारा खर्च काळानुरूप वाढत गेला. अलिकडे 10 ते 12 हजार यासाठी खर्च येत असे. यामधून कारागिरास मजुरी मिळायची, मात्र पुढे यांत्रिकीकरणामुळे सुटे भाग सहजपणे यंत्रावर तयार होऊ लागल्याने मजुरांच्या पोटावर पाय आला.

आधुनिक वेल्डिंग मशीन आल्यामुळे लाकडी सांगाड्याच्या बैलगाडीची जागा लोखंडी सांगाड्याच्या बैलगाडीने घेतली. त्यामुळे लोखंडी बैलगाडी बनविण्याचे कारखाने विकासित झाले. आयती लोखंडी बैलगाडी मिळू लागल्याने लाकडी बैलगाडीकडे शेतकर्‍याने पाठ फिरवली. विज्ञानाचा जसाजसा विकास होत गेला डोंगरदर्‍यातून पक्के रस्ते तयार झाले. दळणवळणाच्या साधनांमध्ये वाढ झाली. शेतकर्‍यांकडे ट्रॅक्टर, रिक्षा टेम्पो व इतर मालवाहू साधने आली. याच्या मदतीने जलद वाहतूक होऊ लागली. शेतीची कामे जलदगतीने होऊ लागल्याने वेळेची बचत होऊ लागली.

शेतमाल ट्रॅक्टर व रिक्षा टेम्पोने बाजारात जाऊ लागल्याने बैलगाडीची गरज कमी झाली. तालुक्याचा विचार केला तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच बैलगाड्या शिल्लक आहेत. इतरत्रही काही फारशी वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला पुस्तकातच बैलगाडी पहावयास मिळेल, अशी स्थिती आहे.

तालुक्यातील तेलवडे येथील शेतकरी कृष्णा म्हात्रे यांनी प्रस्तुत वार्ताहराशी बोलताना सांगितले की, पूर्वी बैलगाडी हे वाहतुकीचे प्रमुख साधन असल्याने ज्याच्याकडे बैलगाडी तो श्रीमंत समजला जायचा, आता मात्र बैलगाडीत बसायलाही कुणी मागत नाही. शेती कमी झाली तसेच स्वयंचलित मालवाहू वाहने आली त्यामुळे आपोआप बैलगाडीचे महत्त्वही आठवणीपुरतेच राहील, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

First Published on: May 18, 2019 5:13 AM
Exit mobile version