त्याने सिगारेट पेटवताच झाला गॅसचा स्फोट; एकाचा मृत्यू

त्याने सिगारेट पेटवताच झाला गॅसचा स्फोट; एकाचा मृत्यू

सिगारेट पेटवताच झाला गॅसचा स्फोट; एकाचा मृत्यू

चाकण परिसरातील खराबवाडी येथे गॅसगळती होऊन भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मांगीलाल चौधरी (३५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर ओमप्रकाश लोहा (२४) हा गंभीर जखमी झाला असून ८० टक्के भाजल्याच पोलिसांनी सांगितले आहे. पहाटे भाजी आणण्यासाठी ते दोघे जाणार होते. तेव्हा, शेजारी राहाणारा मयत मांगीलाल जखमी ओमप्रकाशकडे आला होता. त्याचवेळी ओमप्रकाश याने सिगारेट पेटवली आणि स्फोट झाला. या घटनेमध्ये बाहेर थांबलेल्या मांगीलालचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मांगीलाल चौधरी (३५) आणि जखमी ओमप्रकाश लोहा (२४) हे दोघे शेजारी राहण्यास होते. ओमप्रकाश हा एकटा राहात असून त्याचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे. तर मयत मांगीलाल कुटुंबासह वास्तव्यास होता. त्यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. दोघे ही एक दिवसाआड भाजी आणण्यासाठी सोबत जायचे. बुधवारी रात्री ओमप्रकाशने गॅसवर स्वयंपाक केला आणि जेवण करून तो झोपी गेला. मात्र, रात्री गॅस गळती सुरु होती. पहाटे भाजी आणण्यासाठी जायची असल्याने मांगीलाल ओमप्रकाशला बोलवण्यास त्याच्या घरी आला. तो दरवाज्यात थांबला. तेव्हा ओमप्रकाशने सिगारेट पेटवली तेवढ्यात भीषण स्फोट झाला. यात बाहेर थांबलेल्या मांगीलाल याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला तर ओमप्रकाश हा गंभीर जखमी झाला आहे. घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्थ पडलेले असून खिडल्या दरवाजे भीषण स्फोटात तुटलेले आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी हे अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा – स्फोटके ठेवणार्‍याच्या शोधासाठी 5 पथके


First Published on: June 27, 2019 10:40 AM
Exit mobile version