ओला चारा, बैल माजले!

ओला चारा, बैल माजले!

दिवस सुगीचे सुरु जाहले,
हिरवा चारा बैल माजले
शेतकरी मन प्रसन्न जाहले…
छन, खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम, लेझीम चाले जोरात…

श्रीधर बाळकृष्ण रानडे यांची ही कविता शेतकरी आणि त्याचा मित्र बैलाच्या अनोख्या दोस्तीची कहाणी तर सांगते, पण सुगीचे दिवस सुरु झाल्यानंतर बळीराजा आणि बैल कसे खुशीत येतात, याची धमाल गोष्टही कथन करते. पण हेच बैल जर शहरात माजले तर काय होते, याचा प्रत्यय पवईच्या परिसरातील लोकांना तसेच येथून ये-जा करणार्‍या प्रवाशांना येत आहे.

या बैलांच्या टोळीतील सांडांनी शुक्रवारी सकाळी केलेल्या हल्ल्यात एक आयआयटी विद्यार्थी जखमी झाला आहे. दररोज हे बैलांचे टोळके वाहतुकीला अडथळा निर्माण करत असतानाही महापलिका कायम त्यांच्याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून आले आहे.

विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी हाताच्या बोटावर मोजता येणारे हे मोट-बैल होते. आता त्यात गायींचाही समावेश झाल्याने दरवर्षी जनावरांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. आयआयटी गेट नंबर ९ समोर दोन सांडांची झुंज लागली आणि ती बराच वेळ चालली. कुठलीही झुंज असो मग ती बैलांची का असेना, बघ्यांसाठी ती आकर्षणाचा विषय ठरते. बैलांच्या गावोगावी होणार्‍या झुंजीवर तर बेटिंग चालते. त्या बंद कराव्यात म्हणून कोर्ट-कचेर्‍या झाल्या, पण त्या काही थांबायचे नवा घेत नाहीत. चोरून मारून त्या लावल्या जातात. आता भररस्त्यात फुकट लागलेली ही झुंज बघण्यासाठी फुकट्यांची मोठी गर्दी झाली आणि ही गर्दी झाली म्हणून की काय सांडांनाही स्फुरण चढले. बराच वेळ ती सुरु होती. अचानक बैलांची पळापळ सुरू झाली आणि त्यांनी केलेल्या हल्ल्यात ’ आ बैल मुझे मार ’ अशी परिस्थिती एका विद्यार्थ्यावर आली.

त्रिवेंद्रम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेलेला अक्षय लाथ हा २ महिन्याच्या इंटन शिपसाठी पवईच्या आयआयटीमध्ये आला होता. तो गेटसमोर उभा असता बैलांच्या हल्ल्यात तो जखमी झाला. त्याला विक्रोळीच्या सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

महापालिका काय करू शकते? पाहुया
याविषयी स्थानिक भाजप नगरसेविका वसिहाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या मोकाट बैलांना लगाम घालण्यासाठी महापालिका काय करू शकते याची मी माहिती घेते. त्यानंतर कारवाईचा निर्णय होऊ शकतो.

मंदिरे मोकाट सांडांची आश्रयस्थाने
आयआयटीच्या समोर असलेली मंदिरे ही या बैलांच्या टोळीची आश्रयस्थाने आहेत. पवई आयआयटीसमोरील पंचकुटीर आणि हनुमान मंदिरात येणारे भाविक त्यांना चारा, पाणी देतात आणि वर मंदिरात ते आरामही करत असतात. मंदिरांनी त्यांना दत्तक घेतले असल्याने ते या परिसरात मोठ्या संख्येने दिसतात, असे आतापर्यंत समज होता. मात्र मंदिर व्यवस्थापनाने या मोकाट बैलांशी आमचा काही संबंध नाही, असे सांगत हात वर केले आहेत.

आयआयटी बॉम्बे नेमणार समिती
पवई तलाव आणि आयआयटी परिसरात असलेला बारा महिने मुबलक चारा हे बैलांचे मुख्य आकर्षण आहे. याविषयी आयआयटीतील वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्या सर्व गेटमधून कुठूनही हे बैल येतात, त्यांना आम्ही कसे रोखणार? बैलच नाही तर अन्य प्राण्यांचा मगरी, साप, मुंगूस, कुत्रे यांचा सुळसुळाट झाला आहे. मोकाट बैलांना रोखण्यासाठी तातडीने एक समिती नेमली जाईल. ही समिती महापालिका आणि प्राणी तज्ज्ञांशी संपर्क साधेल.

First Published on: July 13, 2019 5:09 AM
Exit mobile version