Onion Export : या सहा देशात जाणार कांदा; निर्यातीला अखेर परवानगी

Onion Export : या सहा देशात जाणार कांदा; निर्यातीला अखेर परवानगी

मुंबई : केंद्र सरकारने गुजरातमधून 2 हजार टनांपर्यंत पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली होती. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. गुजरातला एक न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. अशातच आता केंद्र सरकारने कांदा निर्यात संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. (Onion export permission from central government relief for Maharashtra farmers)

महाराष्ट्रासह देशातील काही भागांमध्ये गेल्या वर्षी पडलेला कमी पाऊस आणि वेगाने वाढत असलेले कांद्याचे भाव, यामुळे केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी 31 मार्चपर्यंत राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, 31 मार्चनंतर देखील कांद्याच्या निर्यातीवर बंदी कायम ठेवली होती. आधीच अवकाळी पावसामुळे नुकसानीचा सामना करत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या निर्यातबंदीचा मोठा फटका बसला.

कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आणि संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्यातबंदी विरोधात रस्त्यावर उतरत आपला रोष व्यक्त केला. मात्र त्यानंतर ही केंद्र सरकार काही झुकले नाही. अशातच केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच गुजरातमधून 2 हजार टनांपर्यंत पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. ही निर्यात देशातील तीन बंदरांवरून होणार आहे. निर्यात करताना गुजरातच्या फलोत्पादन विभागाची मंजुरीही बंधनकारक करण्यात आली. विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंबंधीची अधिसूचना काढली होती.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे केंद्र सरकारने आता कांदा निर्यातीला परवानगी दिली असून 99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. एकूण 6 देशांमध्ये कांदा निर्यात केला जाणार आहे. केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीईएल स्पर्धात्मक किमतीत ई-प्लॅटफॉर्मद्वारे देशांतर्गत उत्पादकांकडून कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे, आता शेतकऱ्यांना कांदा निर्यातीमुळे चांगला दर मिळू शकतो.

Edited By – Rohit Patil

First Published on: April 27, 2024 4:06 PM
Exit mobile version