२० दिवसांत कांद्याचे दर ५० टक्क्यांनी घसरले

२० दिवसांत कांद्याचे दर ५० टक्क्यांनी घसरले

लासलगाव : महागाईमुळे सर्वच वस्तूंचे दर वाढलेले असताना कांदा या पिकांचे दर मात्र चांगलेच घसरलेले आहे. १ नोव्हेंबर रोजी सरासरी २५५१ रुपये प्रति क्विंटलने विक्री झालेला कांदा आज सरासरी १५०० रुपये प्रति क्विंटलने विकण्याची वेळ कांदा उत्पादकांवर आली आहे. २० दिवसांत कांद्याचे दर ५० टक्क्यांनी घसरल्याने शेतकरी वर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे. चांगला दर मिळेल या अपेक्षेने साठविलेला उन्हाळ कांदा हा मोठ्या प्रमानात खराब होत आहे. त्यात दर घसरल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला आठ रुपये किलो पासून ते दोन हजार रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. कांद्याचा भाव एवढा कमी झाला की उत्पादन खर्च निघणेही अवघड असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. प्रचंड खर्च करुन मेहनतीनंतरही शेतकर्‍यांवर केवळ कमी किंमतीत कांदा विकण्याची वेळ आली आहे. कांदा पीक नगदी असले तरी ते जुगारासारखे झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या निम्मेच उत्पन्न मिळत असल्याने कांदा शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. भाव असते तेंव्हा कांदा नाही आणि कांदा आहे तर भाव नाही. अशी अवस्था झाली आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांना दहा वर्षांपूर्वी मिळणार भाव आणि व आज मिळणारा भाव सारखाच आहे. दुसरीकडे मात्र उत्पादन खर्च तीन पटीने वाढला आहे. दहा वर्षापूर्वी कांद्याला साधारण एकरी खर्च २० हजारांपर्यंत येत होता, तोच खर्च आज ७० हजारांपर्यंत गेला आहे. इंधन दरवाढीमुळे शेतीच्या उत्पादन खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. तर रासायनिक खते, किटकनाशकांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र शेतमालाचे दर काही वाढताना दिसत नाही.

सरासरी भाव आलेख (प्रति क्विंटल)
First Published on: November 20, 2022 11:15 AM
Exit mobile version