राज्यात ३ लाख नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने शिधावाटप, ६५ हजार क्लिंटर धान्याचे वितरण

राज्यात ३ लाख नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने शिधावाटप, ६५ हजार क्लिंटर धान्याचे वितरण

राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. चालू महिन्यात १ मे ते २५ मेपर्यंत राज्यातील १ कोटी ४४ लाख ८५ हजार ७३५ शिधापत्रिका धारकांना ६५  लाख ८० हजार ३३०  क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच २७ लाख २८ हजार ५०२ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२८  स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे १९ लाख ७७ हजार १९१ क्विंटल गहू, १५ लाख १८ हजार ९२५ क्विंटल तांदूळ, तर २१ हजार ९८ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे ३ लाख ९९ हजार ५७९ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. ४ मे पासून एकूण १ कोटी ३ लाख ७१ हजार ८२५ रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील ४ कोटी ६६ लाख ८ हजार  लोकसंख्येला २३ लाख ३० हजार ४०० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील  उपाययोजनेसाठी ३ कोटी ८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप २४ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन आता पर्यंत ७ लाख ५३ हजार ८१० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे ५१ हजार ८९८  क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.

First Published on: May 26, 2020 8:51 PM
Exit mobile version