अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांचा गोंधळ

अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांचा गोंधळ

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होताच शेतकरी कर्जमाफी तसेच महिला अत्याचारविरोधी कायद्यावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. वेलमध्ये उतरत सरकारविरोधी घोषणाबाजी करून विरोधकांनी सुरू केलेल्या गोंधळातच सभागृहाचे कामकाज पार पाडण्यात आले.

‘वंदे मातरम’ने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली. अध्यक्षांनी कामकाज पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचा परिचय सभागृहाला करून दिला. यानंतर लगेचच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार मागील अधिवेशनात का नव्हते याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. मात्र अध्यक्षांनी पुढील कामकाज पुकारले. त्याबरोबर पुन्हा एकदा विरोधी पक्षनेत्यांनी उभे राहत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी केली. राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारकडे नजर लावून आहेत.

महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, अशा परिस्थितीन स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी ही मागणी फेटाळत कामकाज सुरू केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा अध्यादेश सभागृहासमोर ठेवले. त्याचप्रमाणे २४ हजार ७२३ कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर सादर केल्या. हे कामकाज सुरू असतानाच विरोधकांनी वेलमध्ये येत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार कोटींची मदत द्या, महिला अत्याचार विरोधी कायदा झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. या गोंधळातच सभागृहाचे कामकाज पार पाडण्यात आले.

पुष्पसेन सावंत यांना श्रद्धांजली
राष्ट्रवादीचे माजी आमदार स्वर्गीय पुष्पसेन सावंत यांना विधानसभा सभागृहात आदरांजली वाहण्यात आली. पुष्पसेन सावंत यांचा ट्रक ड्रायव्हर ते आमदार असा राजकारणातील प्रवास भारावून टाकणारा होता. त्यानंतरही सर्वसामान्यांच्या हिताच्या प्रश्नांबाबत ते कायम आग्रही राहिले, अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार वैभव नाईक यांनी आदरांजली वाहिली. त्याचप्रमाणे माजी आमदार किसनराव बबनराव राऊत यांनाही आदरांजली वाहण्यात आली.

First Published on: February 25, 2020 4:08 AM
Exit mobile version