खोके, बोके आणि ओके…, पायऱ्यांवर रंगलं विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये बॅनरयुद्ध

खोके, बोके आणि ओके…, पायऱ्यांवर रंगलं विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये बॅनरयुद्ध

नागपूर – दोन वर्षांनंतर नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला रंगत आली आहे. पहिल्या दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभं राहत सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली होती. आजच्या विधिमंडळ कामकाजाच्या सुरुवातीलाही विरोधकांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला. आज सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांविरोधात तुफान घोषणाबाजी आणि बॅनरबाजी केली. खोके, बोके आणि ओकेच्या घोषात विधान भवन परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.

पन्नास खोके, एकदम ओके अशा घोषात विरोधकांनी पावसाळी अधिवेशनही दणाणून सोडले होते. आता हिवाळी अधिवेशनातही विरोधकांनी पायऱ्यांवर उभं राहत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांसमोर नरमेल तो सत्ताधारी कसला. त्यांनीही युक्ती लढवत विरोधकांवर शाब्दिक बाण सोडले आहेत. पन्नास खोके एकदम ओकेला प्रत्युत्तर म्हणून ५० आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले बोके असा घोष सुरू केला आहे. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आमने-सामने येत एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली.

प्रताप सरनाईक, प्रवीण दरेकर यांसह अनेक आमदार विधानभवनाच्या पायरीवर जमा झाले होते. विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत घोषणाबाजी केली.


महाविकास आघाडीला आता पुतण्यामावशीचं प्रेम आलं आहे. त्यांना जशास तसं उत्तर देणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशांकडून पुरावे मागणारे, संतपरंपरेचा अपमान करणारे हेच लोक आहेत. म्हणून आम्ही पायऱ्यांवर उतरलो आहोत, असं आमदार प्रवीण दरेकर म्हणाले.

हिंदू देवदेवतांचा अपमान होत आहे, त्यांचा आम्ही धिक्कार करत आहोत. महापुरुषांबद्दल वक्तव्ये काढल्याप्रकरणी आम्ही धिक्कार करत आहोत, अशी आक्रमक भूमिका आमदार अतुल सावे यांनी आज घेतली.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांचे कल हाती येत आहेत. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा बाळासाहेबांच्या शिवसेनेला अधिक मते मिळाली आहेत. एकनाथ शिंदे यांनी सहा महिन्यात महाराष्ट्रासाठी योगदान दिलं आहे, शेतकऱ्यांचं काम केलं आहे. ५० आमदारांच्या विरोधात काहीही भूमिक असली तरीही सर्वसामान्य लोक आमच्या बाजूने आहेत, हेच यातून स्पष्ट होत आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

पावसाळी अधिवेशनात विधान सभेच्या पायरीवरही विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली होती. घोषणाबाजीमुळे दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्यस्ती करून हे प्रकरण शमवले.

विरोधकांचं आंदोलन

राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी… न्यायालयाचा अवमान करणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो… विदर्भाला न्याय न देणार्‍या सरकारचा धिक्कार असो… ५० खोके एकदम ओके…आनंदाचा शिधा कोणी खाल्ला, जनता म्हणते आम्ही नाही खाल्ला…राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…या सरकारचं करायच काय खाली डोकं वर पाय…खाउन महाराष्ट्राची भाकरी करतात गुजरातची चाकरी… ईडी सरकार हाय हाय… गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी…छत्रपती शिवाजी महाराज की जय…अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत आज दुसऱ्या दिवशीही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईडी सरकारविरोधात आंदोलन केले.

First Published on: December 20, 2022 11:13 AM
Exit mobile version