ATR आधी आणला असता तर वेळ वाया गेला नसता – मुंडे

ATR आधी आणला असता तर वेळ वाया गेला नसता – मुंडे

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

मराठा समाजाला मिळालेलं १६ टक्के आरक्षण यावरच सुरुवातीपासून चर्चा सुरु असलेल्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचं अखेर सूप वाजलं आहे. मराठा समाजासाठीचं आरक्षण हे जरी या अधिवेशनाचं महत्त्वाचं फलित असलं, तरी त्याव्यतिरिक्तच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करता आली नाही अशा आशयाची टीका करत विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधान परिषदेचं कामकाज संपल्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. ‘सरकारनं जर मराठा आरक्षणासंदर्भातला एटीआर लवकर आणला असता, तर अधिवेशनाचा वेळ वाया गेला नसता’, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

‘इथे घोषणांचा दुष्काळ!’

‘शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर यंदाच्या हिवाळी अधिवेशनात कोणतीही चर्चा झाली नाही. त्याविषयी कोणतंही ठोस आश्वासन किंवा घोषणा झाली नाही. त्यामुळे इथे घोषणांचाच दुष्काळ पाहायला मिळाला’, असं धनंजय मुंडे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ‘मुख्यमंत्र्यांनी दुष्काळावर चर्चा करायला सांगितलं. चर्चेच्या शेवटी शेतकऱ्यांना मदत जाहीर करू असंही सांगितलं. पण त्याबद्दल काहीही निर्णय घेतला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम राज्य सरकारने केलं, अशा शब्दांत मुंडेंनी सरकारवर तोंडसुख घेतलं.

‘मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला फसवलं’

‘टीसचा अहवाल सभागृहात ठेवण्यासाठी शेवटपर्यंत हे सरकार तयार झालं नाही. पहिल्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री धनगर आरक्षण देणार होते. पण चौथ्या वर्षाच्या अधिवेशनात देखील साधा टीसचा अहवालसुद्धा मुख्यमंत्र्यांनी ठेवला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे’, असं मुंडे यावेळी बोलताना म्हणाले. तसेच ‘मुस्लिम समाजाचं शैक्षणिक आरक्षण उच्च न्यायालयाने ग्राह्य धरून सरकारला कायदा आणायला सांगितलं. पण सरकारने कायदा आणला नाही. सरकार मुस्लिम विरोधी असल्याचं पुन्हा सिद्ध झालं’, अशी टीका देखील त्यांनी केली.


हेही वाचा – विधानभवनातील महाराजांचा पुतळा हटवणार

‘मंत्र्यांची एसीबी चौकशी व्हायला हवी’

दरम्यान, सरकारने सभागृहात मंत्र्यांच्या घोटाळ्यांवर पूर्ण चर्चा करू दिली नाही. आम्ही घोटाळ्यांचे पुरावे सादर केले. पण सरकारने कारवाई केली नाही. मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांना क्लीन चिट दिली. या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक काही लोकांना फायदा होण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला. आमची मागणी आहे की या मंत्र्यांची एसीबी चौकशी व्हायला हवी.

‘आता रस्त्यावर उतरून लढू’

‘आम्ही दुष्काळी भागासाठी मदतीच्या मागण्या करत असतानाच त्या गोंधळात सभागृह स्थगित केलं. पण आता अधिवेशन संपल्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी आणि दुष्काळासाठी रस्त्यावर उतरून आम्ही आता लढणार आहोत. दुष्काळासोबतच इतरही सर्व प्रलंबित मुद्द्यांसाठी सदनातली लढाई आता आम्ही रस्त्यावर नेऊन नवा संघर्ष पेटवणार आहोत’, असा निर्धार यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.


हेही वाचा – मराठा आरक्षणानंतर आता गुन्हेही घेतले मागे!
First Published on: November 30, 2018 6:57 PM
Exit mobile version