अतुल भातखळकरांच्या ‘भलत्याच’ विधानाने विधानसभेत गदारोळ

अतुल भातखळकरांच्या ‘भलत्याच’ विधानाने विधानसभेत गदारोळ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप विरोधकांनी अतुल भातखळकर यांच्यावर केला

शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यावरुन नवनवीन वाद निर्माण होत आहेत. आज विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारने पुतळयाची उंची पुन्हा कमी केली असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना उद्देशून विरोधक भलत्याच विषयावर चर्चा करत असल्याचे विधान केले. यावर विरोधक चांगलेच भडकले आणि या गदारोळात दोन वेळा विधानसभा तहकूब करावी लागली. त्यानंतर अतुल भातखळकर यांनी प्रसंगावधान राखत आपण केलेले वक्तव्य शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत नसून पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबतीत होते, अशी सारवासारव केली. मात्र विरोधक त्यांच्या निलंबनावर ठाम राहिले.

विधानसभेत विरोधकांची जय शिवाजी घोषणाबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, “भाजपमधील मनूवादी विचारांचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भलते-सलते वक्तव्य करुन संभ्रम निर्माण करतात. अतुल भातखळकर यांनी विधानसभेत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांचे तात्काळ निलबंन करावे, नाहीतर आम्ही कामकाज चालू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली.

यानंतर शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी सांगितले की, राज्याची तिजोरी मोकळी झाली तरी चालेल पण महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी झाली नाही पाहिजे, अशी सेनेची भूमिका आहे. त्यानंतर मात्र राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारची बाजू सावरत विरोधकांवरच शरसंधान साधले. त्यामुळे सभागृहात दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी पाहायला मिळाली.

First Published on: July 17, 2018 1:22 PM
Exit mobile version