संजय राऊतांना हजर करण्याचे आदेश ईडीला द्या, मेधा सोमय्यांची कोर्टाकडे मागणी

संजय राऊतांना हजर करण्याचे आदेश ईडीला द्या, मेधा सोमय्यांची कोर्टाकडे मागणी

खासदार संजय राऊत ईडीच्या कोठडीत असल्यामुळे ते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी शनिवारी शिवडी न्यायालयासमोर हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे खासदार संजय राऊत यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश ईडीला द्या, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने 18 ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे.

काय आहे प्रकरण –

खासदार संजय राऊत यांनी शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोप सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता. न्यायालयाने यापूर्वी मेधा यांच्या तक्रारीची दखल घेत राऊत यांना समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, राऊत न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या नावे जामीनपात्र वॉरन्ट बजावले होते. त्यानंतर १८ जुलै रोजी राऊत न्यायालयात हजर झाले. त्यानंतर त्यांच्या विरोधात बजावलेले जामीनपात्र वॉरन्ट न्यायालयाने रद्द केले होते. जबाब नोंदवण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने राऊत यांना दिले होते.

मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीत काय  –

महानगरदंडाधिकाऱ्यांकडे मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीत संजय राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. संजय राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती.

First Published on: August 6, 2022 3:33 PM
Exit mobile version