अन्यथा पुन्हा लॉकडाऊनची वेळ

अन्यथा पुन्हा लॉकडाऊनची वेळ

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून असलेला लॉकडाऊनचा पडदा सोमवारपासून वर जाणार आहे. राज्य सरकारने, राज्यातील जिल्ह्यांचे पाच गटात वर्गीकरण केले असून प्रत्येक जिल्ह्यात सोमवारपासून काय सुरू होणार हे स्पष्ट केले आहे. अडीच महिन्यांपासून बहुतेक व्यवहार ठप्प असताना शिथिल होणारे निर्बंध सर्वसामान्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांनाच सुखावह आहेत. मात्र, हे निर्बंध सैल होत असले तरी प्रत्येकाने काळजी घेत मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, गर्दी टाळणे, हे कोरोनाचे नियम पाळायचे आहेत. अन्यथा पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊन पुन्हा लॉकडाऊनचे दुष्टचक्र सुरू होणार असल्याचा इशारा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिला आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. राज्य सरकारकडून लॉकडाऊन शिथिलतेसाठी पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. याबाबतची नवी नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. या पाच टप्प्यांपैकी मुंबई, ठाणे, नाशिक यांचा समावेश तिसर्‍या टप्प्यात करण्यात आला आहे. रायगडचा समावेश हा चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये नव्या नियमावलीनुसार मुंबई, ठाणे, नाशिक, रायगडमध्ये सकाळी ७ ते दुपारी २ अशा वेळेत दुकाने आणि इतर व्यवहार सुरू राहणार आहेत. मात्र, शनिवार, रविवारी मात्र सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. निर्बंध उठवलेल्या काळात नागरिक नेमका कसा प्रतिसाद देतात, किती गर्दी करतात आणि त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या किती वाढतेय, हे पाहून निर्बंध शिथिल ठेवायचे की पुन्हा कडक करायचे याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येणार आहे.

First Published on: June 6, 2021 11:58 PM
Exit mobile version