पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत

पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत

येथील शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री आणि माजी शिवसेना खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच, असे सांगत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली आहे. यानिमित्ताने रायगडमधील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस खास करून अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा जुना वाद, राजकीय वैर पुन्हा एकदा डोके वर काढू लागल्याचे दिसत आहे.

काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का, एकमेकांचे कधी जमत होते का, यांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापी होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेब ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे, असे वक्तव्य अनंत गीते यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अज्ञातवासात गेलेले अनंत गीते पुन्हा रायगडच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडीमधील स्थानिक पातळीवरील मतभेद समोर येऊ लागले आहेत. राज्यात जरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मतभेद बाजूला ठेवत एकत्र जरी आले असले तरी स्थानिक पातळीवर या पक्षातील नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नसल्याचे दिसून आले आहे. रायगड जिल्ह्यातही याचीच प्रचिती पहायला मिळाली. श्रीवर्धनमध्ये सोमवारी श्रीवर्धन इथे त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबकर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली.

गीतेंच्या वाक्याशी सहमत –नाना पटोले
शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अनंत गीते यांचे महाविकास आघाडी सरकारबाबतचे विधान अगदी योग्य आहे. महाविकास आघाडी ही तत्कालिन राजकीय परिस्थिती पाहून तयार झालेली आहे. त्यामुळे अनंत गीतेंच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करतो. मात्र, ‘शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला’ या गीतेंच्या वक्तव्यावर पटोले यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही फक्त गीतेंच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होतो या वाक्याशी सहमत आहोत. अनंत गीते काहीच चुकीचे बोलले नाहीत, असे नाना पटोले म्हणाले.

गीतेंनी पवारांच्या पायाला हात का लावले – तटकरे
महाविकास आघाडी झाली तेव्हा अनंत गीतेंनी शरद पवारांच्या पायाला हात लावला होता. पवारांच्या पाया पडले होते. आणि आघाडी केल्याबद्दल आभारही मानले होते, असे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. अनंत गीते यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गीते यांच्या आरोपाचा समाचार घेतला. अनंत गीते दोन वर्षे अज्ञातवासात की विजनवासात होते हे माहीत नाही. परंतु, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळ नेतेपदी निवड होत असताना वांद्रे परिसरातील एका हॉटेलमध्ये अनंत गीते आले होते. त्यावेळी त्यांनी आदरणीय पवारसाहेबांना अतिशय वाकून नम्रपणे पायाला हात लावत केलेल्या आघाडीबद्दल आभार मानले. या घटनेचा मी साक्षीदार आहे, असे तटकरे यांनी सांगितले.

शरद पवार देशाचे नेते –संजय राऊत
अनंत गीतेंच्या वक्तव्याबद्दल मला काही माहीत नाही. महाराष्ट्रातली व्यवस्था ही तीन पक्षांची एकत्र असलेली व्यवस्था आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. शरद पवार असतील, काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे यांनी एकत्र बसून ठरवले आहे, सरकार बनवायचे आणि चालवायचे आहे. मला वाटते हे सरकार 5 वर्षे चालेल आणि या व्यवस्थेला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

First Published on: September 22, 2021 7:15 AM
Exit mobile version