मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्याचा मार्ग मोकळा

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्याचा मार्ग मोकळा

प्रातिनिधिक फोटो

राज्यातील विविध महानगरांमधील मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास कुठलीही बंदी नाही, अशी बंदी कोणी करत असेल तर त्यावर कारवाई करण्याच्या संबंधी गृह विभाग सहा आठवड्यांच्या आत धोरण ठरविणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात दिली. मल्टिप्लेक्स, महामार्गावरील फुडमॉल व मॉलमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यास घालण्यात येणारी बंदी आणि आतमध्ये खाद्यपदार्थांची जादा दराने होणारी विक्री याकडे मुंडे यांनी सरकारचे लक्ष वेधले होते.

मल्टीप्लेक्स चालक बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव करतात व आतमध्ये त्यांच्याकडील खाद्यपदार्थांची चढ्या दराने विक्री करतात, असा आरोप करून यासंबंधी कायदा करण्याची मागणी केली. त्यावर राज्यमंत्री चव्हाण यांनी वरील उत्तर दिले. त्याचबरोबर पाण्याची बॉटल असेल किंवा अन्य खाद्यपदार्थ यांचे दर मल्टीप्लेक्स, मॉल मध्ये वेगळे आणि बाहेर वेगळे का? असा प्रश्न केला त्यावर केंद्र सरकारने केलेल्या कायद्याप्रमाणे 1 ऑगस्ट पासुन एकाच वस्तुची वेगवेगळी एमआरपी राहणार नसल्याचे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या लक्षवेधीत आमदार संजय दत्त, आमदार अनिल भोसले, आमदार निलम गोऱ्हे, आमदार प्रवीण दरेकर यांनीही उपप्रश्न विचारले. या लक्षवेधीमुळे यापुढे आता प्रेक्षकांना मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच १ ऑगस्ट पासुन खाद्यपदार्थांचे एकच एमआरपी राहणार असल्याने मल्टिप्लेक्स मध्येही त्याच किंमतीत वस्तू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे अधिवेशन संपल्यानंतर संबंधित सदस्यांची बैठक घेण्याचे आदेश उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी यावेळी दिले.

First Published on: July 13, 2018 12:39 PM
Exit mobile version