ऑक्सिजन अभावी रूग्णांचा जीव धोक्यात

ऑक्सिजन अभावी रूग्णांचा जीव धोक्यात

मुंबईत लवकरच घरपोच ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक रूग्णांना व्हेंटीलेटर, ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. शहरात पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासन एकिकडे सांगत असले तरी, दुसरीकडे शहरातील एका रूग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपल्याने रूग्णांना दुसरीकडे हलविण्याचा सल्ला रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याने रूग्णांच्या नातेवाईकांची एकच धावपळ उडाली.

नाशिकमध्ये सध्या दररोज चार ते साडेचार हजार कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहे. यातील अनेक रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासते याकरीता महापालिकेची रूग्णालये, कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच खाजगी रूग्णालयांमध्येही ८० टक्के बेड राखीव ठेवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती अतिशय गंभीर आहे रूग्णांलयांमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने रूग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. आज शहरातील नाशिक पुणे महामार्गावरील एका खाजगी रूग्णालयांत ऑक्सिजन अभावी रूग्णांना अन्यत्र हलविण्याची वेळ आली. या रूग्णालयात ३० रूग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र रूग्णालयाचा ऑक्सिजनचा साठा संपल्याने या रूग्णांना इतरत्र हलविण्याचा सल्ला संबधित रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन बेडची शोधशोध करावी लागत आहे. यामुळे रूग्णांलयात एकच गोंधळ उडाला.

First Published on: April 8, 2021 2:54 PM
Exit mobile version