वीज केंद्रातून थेट हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा, महाराष्ट्रात परळीतला पहिलाच प्रयोग

वीज केंद्रातून थेट हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा, महाराष्ट्रात परळीतला पहिलाच प्रयोग

वीज केंद्रातून थेट हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा, महाराष्ट्रात परळीतला पहिलाच प्रयोग

मुंबई संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या भीषण प्रादुर्भावामुळे  रुग्ण वाढीचा उद्रेक होऊन ऑक्सिजनची तीव्र टंचाई निर्माण झाली असताना  महानिर्मितीने मोठा दिलासा दिला आहे. महानिर्मितीने तातडीने युद्ध पातळीवर आपल्या नवीन परळी औष्णिक  वीज केंद्रातून अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाला प्रतिदिन २८८ जम्बो सिलेंडर क्षमतेचा  व ९५.२ टक्के शुद्धतेचा ऑक्सिजन प्लांट उभारल्याने  परळी-बीड परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे

आज दि २७ एप्रिल रोजी या ऑक्सिजन प्लांटचे आभासी लोकार्पण मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे,  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुकरे तसेच महानिर्मितीचे अन्य  सर्व संचालक, कार्यकारी संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

राज्यात सध्या कोरोनाचा उद्रेक प्रचंड वाढला असून दररोज मृत्यू संख्येचा आकडा वाढत आहे. शहर व जिल्ह्यातील सर्व खासगी व शासकीय  हॉस्पिटल, तसेच कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या उपलब्धतेची वाढती मागणी लक्षात घेऊन महानिर्मितीच्या वीज केंद्रातील ओझोन प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा करता येणे शक्य आहे का याची शक्यता तपासण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांनी सूचित केले होते. त्यानंतर महानिर्मितीने तत्परतेने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे  व पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तंत्रज्ञांनी अहोरात्र मेहनत करून काही दिवसांतच प्लांट उभा केला त्याबद्दल त्यांचे कौतुक व्यक्त करण्यात आले.

तसेच  महानिर्मितीच्या अन्य औष्णिक केंद्रातूनही अशाच प्रकारचे ऑक्सिजन प्लांट उभारता येतील काय याची तांत्रिक व प्रशासकीय व्यवहार्यता तातडीने तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे अशी माहिती देण्यात आली. या संकटकाळात ऊर्जा विभागाने आपल्या परीने योगदान देऊन परिसरातील  रुग्णांना निश्चितच दिलासा दिला आहे याबाबत  समाधान व्यक्त केले

परळी-बीड सारख्या भौगोलिक दृष्ट्या तुलनेने दुर्लक्षित भागात औषधे व ऑक्सिजन यासारख्या वैद्यकीय  सामुग्रीचा तुटवडा असताना बीड जिल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सध्याच्या परिस्थितीत परिसरातील गोरगरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना या ऑक्सिजन प्लांटमुळे जणू प्राणवायू मिळाला आहे या शब्दात ऊर्जा विभागाचे विशेष आभार मानताना त्यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थाकीय संचालक संजय खंदारे व त्यांच्या चमुचे कौतुक केले. तसेच याच तत्परतेने आणखी थोडे प्रयत्न करून नवीन परळी वीज केंद्रातून कॉम्प्रेसर्स व रिफिलिंग प्रणालीच्या माध्यमातून अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा सदर रुग्णालयातील नव्या नियोजित कोविड सेंटरला करावा अशीही सूचना केली. तसेच सध्या या नव्या ऑक्सिजन प्लांटमधून सुमारे ९५.२ इतक्या शुद्धतेचा ऑक्सिजन पुरवला जात असला तरीही यापुढे सदर प्लांटचे संचलन अहोरात्र योग्य सुरक्षित पद्धतीने व्हावे व कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी अशीही स्पष्ट सूचना रुग्णालय अधिष्ठाता याना दिली. या संपूर्ण आभासी लोकार्पण (virtual inaugration) छोटेखानी सोहळ्याचे सूत्रसंचालन महानिर्मितीचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी केले.

First Published on: April 27, 2021 9:42 PM
Exit mobile version