वृत्ती, कार्यातून देशाचे हित हीच राष्ट्रभक्ती

वृत्ती, कार्यातून देशाचे हित हीच राष्ट्रभक्ती

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी

कल्याण । राष्ट्र भक्तीचे रंग दाखविण्यासाठी घरावर, देशभर तिरंगा फडकवला म्हणजे राष्ट्रभक्ती सिध्द होत नाही. हा राष्ट्र भक्तीचा दंभपणा असल्याचे मत व्यक्त करुन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आपल्या वृत्ती आणि कार्यातून आपण देशाचे किती हित, किती नुकसान करतोय याची जाणीव ठेऊन देशसेवेत सक्रिय असणे म्हणजे राष्ट्रभक्ती आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा उपक्रमावर केली.

डोंबिवलीत एका कार्यक्रमासाठी तुषार गांधी रविवारी आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. एक दिवस तिरंगा फडकावायचा त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करायचे. आपल्या वृत्ती, कृतीत राष्ट्रभक्ती दिसली पाहिजे. सामान्यांचे अनेक प्रश्न दुर्लक्षित आहेत. या गंभीर विषयाकडे सामान्यांचे लक्ष जाऊ नये म्हणून महापुरुषांच्या वादाचे विषय उपस्थित केले जातात. आता प्रत्येकाने आपला महापुरूष वाटून घेतला आहे. प्रत्येक जण सोयीप्रमाणे महापुरुष वापरुन सामान्यांना झुलवत ठेवत आहेत. सामान्यांचे प्रश्न कायमच दुर्लक्षित राहिले आहेत. त्याकडे कधी कोणाचे दुर्लक्ष जाऊच नये म्हणून किरकोळ कारणावरुन वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत, असे गांधी म्हणाले.

भारत जोडो यात्रा ही काळाची गरज होती. यानिमित्ताने समाजात एक चांगला संदेश गेला आहे. आता या यात्रेच्या यशाचा काँग्रेस कसा व्यापक प्रमाणात उपयोग करुन घेत आहे, त्यावर या यात्रेचे यश अवलंबून आहे. या यात्रेचा राहुल गांधींना मोठा फायदा झाला, असे ते म्हणाले. अहंकार प्रदर्शित करण्यासाठी पुतळ्याचे राजकारण केले जाते. ज्यांचा पुतळा बसविला जातो, त्यांना त्याचा काहीच फरक पडत नाही. मग त्या विषयावरुन आपण का भांडतो याचा कोणीच विचार करत नाही. त्यामुळे या विषयात आपणास स्वारस्य नाही, असे गांधी म्हणाले. चलनी नोटेवर गांधींची छबी महात्मा गांधीजींच्या तत्वा विरोधी आहे. त्यामुळे चलनी नोटेवर गांधीजींची छबी नसावी असे आपले मत आहे, असे गांधी म्हणाले. ‘गांधी गोडसे’ चित्रपटावरुन लक्ष विचलित करण्यासाठी ‘पठाण’ चित्रपटाचा वाद निर्माण करण्यात आला, असे तुषार गांधी यांनी सांगितले.

First Published on: February 6, 2023 9:54 PM
Exit mobile version