तुम्हाला राज्य चालवायचेय की स्वयंपाक करायचाय!

तुम्हाला राज्य चालवायचेय की स्वयंपाक करायचाय!

पवार यांचा सत्ताधार्‍यांना टोला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून वचननामा जाहीर करण्यात आला आहे. पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयात जेवण देण्याची घोषणा शिवसेनेने वचननाम्यात केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर येथील सभेत जोरदार टीका केली आहे. तुम्हाला राज्य चालवायला दिले आहे की, स्वयंपाक करायला? असा टोला त्यांनी लगावला आहे.

शरद पवार यांची सोलापूर येथील बार्शी मतदारसंघात शनिवारी सभा झाली. त्यापूर्वी शिवसेने वचननामा जाहीर करण्यात आला. त्यावरून पवार यांनी आपल्या खास शैलीत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. “युतीचे सरकार असताना शिवसेनेने १ रुपयांत झुणका-भाकर ही योजना सुरू केली होती. मात्र, ही योजना कधी बंद झाली ते कळलेही नाही. तुम्हाला राज्य चालवायला दिले आहे का स्वयंपाक करायला?” अशा शब्दात शरद पवार यांच्याकडून शिवसेनेवर टिकास्त्र सोडले.

भाजपने सत्तेवर आल्यानंतर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करू, असे आश्वासन दिले होते. पण समुद्रात एक वीटही उभी राहिली नाही. उलट शिवछत्रपतींच्या काळात ज्या किल्ल्यांवर भवानी तलावर तळपली, त्या किल्ल्यांवर भाजप-शिवसेनेच्या काळात ’छमछम’ बघावी लागेल अशी चिन्हे आहेत,’ अशी खंतही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

First Published on: October 13, 2019 6:18 AM
Exit mobile version