आरोग्य सेविकांना कोरोनाच्या काळात दुप्पट मानधन द्या – महापौर

आरोग्य सेविकांना कोरोनाच्या काळात दुप्पट मानधन द्या – महापौर

मुंबईत कोरोना विषाणूचा संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेने आता प्रत्येक इमारती आणि चाळ, झोपडपट्टीमध्ये आरोग्य सेविकांना पाठवून सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. मात्र, आजवर महापालिकेने ८ हजार रुपयांचे मानधन देण्यास मंजुरी देवूनही प्रशासनाने तांत्रिक मुद्दयामुळे या आरोग्य सेविकांना वाढीव मानधनापासून वंचित ठेवले आहे. तरीही संकटाच्यावेळी महापालिकेच्या आरोग्य सेविका धोका पत्करत रस्त्यावर उतरुन लढा देत आहे. त्यामुळे या आरोग्य सेविकांना प्रोत्साहन मानधन म्हणून ५ हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या कालावधीत आरोग्य सेविकांना मानधनाची रक्कम दुप्पट दिली जाणार आहे.

मुंबईतील २०८ आरोग्य केंद्रामध्ये सध्या एकूण ३७०० आरोग्य सेविका कार्यरत आहेत. यासर्वांना महापालिकेच्यावतीने ५ हजार रुपये मानधन  दिले जात आहे. मात्र, या मानधनात वाढ करण्याबरोबरच आपल्या विविध मागण्यांसाठी सप्टेंबर २०१९मध्ये आरोग्य सेविकांनी आंदोलन केले होते. त्यानुसार प्रशासनाने त्यांना अडीच हजार रुपये वाढ देण्याचा प्रस्ताव तयार करून ७ हजार ५०० एवढे मानधन देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर महापालिकेने हे मानधन ८ हजार रुपये देण्याच्या ठराव केला. परंतु महापालिकेच्या मंजुरीनंतरही काही तांत्रिक कारणांमुळे या वाढीव मानधनाचा लाभ आरोग्य सेविकांना मिळत नाही.

मात्र, वाढीव मानधन महापालिकेकडून मिळत नसतानाही, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये आरेाग्य सेविका महत्वाची भूमिका बजावत आहेत. प्राथमिक स्तरावरच कोरोनाचे रुग्ण शोधण्याचे काम आणि मुंबईकरांचे सर्वेक्षण करण्याचे काम आरोग्य सेविकांवर सोपवण्यात आले आहे. मात्र, पाच हजारांसाठी आपले आरोग्य धोक्यात घालण्यास आरोग्य सेविकांच्या कुटुंबाकडूनच विरोध होत आहे. त्यामुळे बहुतांशी आरोग्य सेविकांनी गरज म्हणून तर काही महापालिकेची सेवा म्हणून कामाला सुरुवात केली. तर काहींनी सेवा बजावण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच ज्याप्रकारे करोनासंदर्भात सेवेत असलेल्या अत्यावश्यक सेवा तसेच आपत्कालिन सेवेतील डॉक्टरांससह कामगारांना दिल्या जाणाऱ्या  ३०० रुपयांच्या जोखीम भत्याच्या धर्तीवर आरोग्य सेविकांना दुप्पट मानधन देण्याची मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात बोलतांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी सचिन पडवळ यांनी केलेल्या मागणीनुसार आरोग्य सेविकांना दुप्पट मानधन देण्याच्या मागणीबाबत आयुक्तांशी चर्चा झाली आहे. करोनाच्या या कालावधीत हे दुप्पट मानधन दिले जाणार आहे. त्यानंतर महापालिकेने मंजूर केल्याप्रमाणे ८ हजार रुपयांचे मानधन  दिले जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोरोनाच्या कालावधीत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना पाच हजार रुपये मानधन आणि पाच रुपये प्रोत्साहन भत्ता याप्रमाणे एकूण १० हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले.

First Published on: April 9, 2020 3:55 PM
Exit mobile version