विकृतीचा कळस : शहरात सर्वाधिक बलात्कार निकटवर्तीयांकडून

विकृतीचा कळस : शहरात सर्वाधिक बलात्कार निकटवर्तीयांकडून

 

महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. शहरात बलात्काराच्या घटनांमध्ये २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये ३५ ने वाढ झाली असून १३ पोलीस ठाण्यांमध्ये २०२३ मध्ये १०९ फिर्यादी दाखल झाल्या आहेत, यातील १०९ घटनांची उकल झाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून युवती व महिलांवर बलात्कार करण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

देशात आजपर्यंत नोंदविण्यात आलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी तब्बल ९५ टक्के गुन्ह्यांत पीडित अल्पवयीन मुली वा तरुणींवर जवळच्या किंवा परिचितांकडूनच अत्याचार करण्यात आल्याचे राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. लैंगिक छळाला बळी पडलेल्या पीडितांमध्ये सर्वाधिक संख्या १० ते १८ वयोगटातील मुलींची असून, ही आकडेवारी चिंताजनक आहे. अनेक मुली वा महिला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करतात. मात्र, यातील दोषी बर्‍याचदा जामीन घेऊन सुटतात. परंतु, पीडित मुली वा महिला शारीरिक व मानसिकदृष्ठ्या खचून जातात. त्यानंतर अनेक युवती आत्महत्याही करतात.

केंद्र शासनाने महिलांवरील अत्याचाराचे कायदे अधिक कडक करूनही अत्याचार वाढतच आहेत. बुलढाणा शहरालगतच्या राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी थांबलेल्या एका ३५ वर्षीय महिलेवर आठ नराधमांनी चाकूचा धाक दाखवून आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने राज्यही ढवळून निघाले होते. त्यानंतर महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे अधिक कडक करण्यात आले. मात्र, तरीदेखील अत्याचाराच्या घटना वाढतच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पालकांनी मुलामुलींशी सतत संवाद ठेवाला पाहिजे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

लग्नास नकार दिल्याचे कारण अधिक

अल्पवयीन मुले प्रेमात पडल्यावर अथवा ते पळून गेल्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध येतात. अशा वेळी फसवणूक झाल्यानंतर घडलेल्या गुन्ह्यांत वाढीव कलम ३७६ लावले जाते. अनेकवेळा ३७६ (बलात्कार) गुन्हे हे प्रेमसंबंधातून संमतीने होतात, मात्र पुढे लग्नास नकार दिला गेल्यामुळे शहरातील १३ पोलीस ठाण्यांमध्ये असे गुन्हे सर्वाधिक दाखल झाले असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

प्रबोधन,समूपदेशनाचा पर्याय

निकटवर्तीय किंवा ओळखीच्या व्यक्तीकडूनच होणार्‍या अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण बघता केवळ कायदा महिला अत्याचारांना रोखण्यास पुरेसा नसल्याचे कायदे आणि समाजशास्त्र अभ्यासकांचे मत आहे. त्यासाठी समाजानेच पुढाकर घेणे आणि समुपदेशन, वेळोवेळी मार्गदर्शन यातूनच पालकांनी आपल्या पाल्यांचे, मुलींचे प्रबोधन करणे गरजेचे बनले आहे, अशी प्रतिक्रियाही अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे.

किशोरवयीन मुलामुलींना शारीरिक आकर्षण असते. मुलामुलींना बंधन नको असतात. मित्रमैत्रिणी जे करतात, तेच आपण करावे, असे अनेकांना वाटते. त्यातून अनेक मुली, तरुणी नकळत प्रेमात पडतात. त्याचा गैरफायदा घेत संबंधित व्यक्ती अत्याचार करून फसवणूक करतो. ते टाळण्यासाठी मुलेमुली व आईवडिलांनी एकमेकांशी मनमोकळे संवाद साधला पाहिजे. कोणाच्या दबावाला बळी पडू नये.
– उमेश नागापूरकर, मानसोपचार तज्ज्ञ

First Published on: December 20, 2023 2:39 PM
Exit mobile version