पत्राचाळच नाही, तर पर्ल ग्रुप घोटाळा प्रकरणातही संजय राऊतांचे नाव, नेमका घोटाळा काय?

पत्राचाळच नाही, तर पर्ल ग्रुप घोटाळा प्रकरणातही संजय राऊतांचे नाव, नेमका घोटाळा काय?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. संजय राऊत चौकशीत सहकार्य करत नाहीत, असा आरोप ईडीने कोर्टात केला आहे. मात्र, या चौकशीनंतर पर्ल ग्रुप घोटाळा प्रकरणातही संजय राऊतांचे नाव समोर आले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या अटकेखाली असलेल्या प्रवीण राऊत यांची पर्ल ग्रुपच्या हजारो कोटींच्या चिटफंड प्रकरणातही चौकशी केली जात आहे. ज्यामध्ये राऊतांच्या नावाचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका बेनामी जमिनीचं कनेक्शन हे प्रवीण राऊत यांच्यासंदर्भातील आहे. या पर्ल अॅग्रोटेक घोटाळा प्रकरणाची सध्या ईडीच्या दिल्ली युनिटकडून चौकशी केली जात आहे. २१ मे २०२२ रोजी ईडीने पर्ल ग्रुपवर छापेमारी करत वसई पट्ट्यांतील १८७ कोटी रूपये मूल्याची ५७ एकर जमीन जप्त करण्यात आली आहे.

नेमका घोटाळा काय?

६० हजार कोटी रूपयांच्या घोटाळा प्रकरणातील २ हजार कोटी रूपये प्रवीण राऊत यांना मिळाल्याचा ईडीला संशय आहे. यामध्ये राऊतांना आर्थिक लाभ झाल्याचा ईडीला संशय असून त्यासंदर्भात चौकशीही केली जाणार आहे. या कंपनीने सामान्य लोकांच्या खिशातून गोळा केलेल्या पैशांतून वसई, विरार, पालघर पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली होती. तसेच गृहनिर्माण प्रकल्पाचे बांधकामही सुरू केले होते.

वर्षा राऊतांच्या अडचणीत वाढ

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठवले आहे. पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्याने ईडीने हे समन्स बजावले आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. तसेच, आपली बाजू मांडावी लागणार आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत यांना HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रुपये पाठवण्यात आले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले, अशी माहिती ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिली होती. त्यामुळे आता वर्षा राऊत मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : मुंबै बँकेवर दरेकरांची वर्णी लागण्याची शक्यता, मविआला धक्का बसणार


 

First Published on: August 4, 2022 10:41 PM
Exit mobile version